जळगाव : चोरीच्या आठ मोटार सायकलींसह मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोटार सायकल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एकुण 3 लाख 20 हजार रुपये किमतीच्या आठ मोटार सायकलींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संतोष ऊर्फ शेरा गजानन इंगोले (रा. पांगरी कुटे ता. मालेगाव जहाँगीर जि. वाशीम) असे अटक करण्यात आलेल्या म्होरक्याचे नाव आहे.
जामनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीच्या मोटार सायकलींची विल्हेवाट लावणा-या सुनिल शामराव भिल (रा. पिंप्री सीम ता.एरंडोल), खुशाल ऊर्फ भैय्या राजु पाटील (रा. नागदुली ता. एरंडोल), गोविंदा अभिमन्यु कोळी (रा. नागदुली ता.एरंडोल) आणि हर्षल विनोद राजपुत (रा. मोहाडी ता.पाचोरा) अशा चौघांकडून 7 लाख 60 हजार रुपये किमतीच्या सोळा मोटार सायकली यापूर्वी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या चोरीच्या टोळीतील मुख्य आरोपी संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले हा फरार होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते.
चोरी केलेल्या मोटार सायकली विक्री करण्यासाठी संतोष उर्फ शेरा हा जळगाव शहरात येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला चोरीच्या मोटार सायकलींसह अटक करण्यात आली. चौकशीअंती त्याने बुलढाणा, वाशिम, अकोला, गुजरात राज्यात चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. यापुर्वी 16 आणि आता 8 अशा एकुण 24 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील तपासकामी अटकेतील आरोपीस जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील सपोनि निलेश राजपुत, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चोबे, सफौ अनिल जाधव, हे.कॉ. संदिप सावळे, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, प्रितम पाटील, पो.ना. भगवान पाटील, हेमंत पाटील, कृष्णा देशमुख, ईश्वर पाटील, पो. कॉ. सचिन महाजन, लोकेश माळी, चापोकॉ महेश सोमवंशी, प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.