पुणे : प्रेमात दगाबाजी झाल्यामुळे संतापाच्या भरात प्रेमवीर काय करेल याचा नेम नसतो. प्रेमात धोका मिळालेल्या आसीफ उर्फ बोहरा शेख या प्रेमविराचा केवळ रिक्षाचालकांवरच राग होता. त्याचे कारण म्हणजे त्याची प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेली होती. प्रेयसी रिक्षाचालकासोबत पळून गेल्याचा राग प्रेमवीराने 80 मोबाईल चोरुन व्यक्त केला. त्याने चोरलेले सर्व 80 मोबाईल केवळ रिक्षाचालकांचेच होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आल्यामुळे पोलिस देखील चकीत झाले.
पुण्याच्या लष्कर पोलिसांनी आसिफ उर्फ बोहरा शेख नावाचा एक चोरटा प्रेमवीर ताब्यात घेतला. त्यच्या ताब्यातून एक-दोन नव्हे तर तब्बल 80 मोबाईल हस्तगत करण्यात आले. एवढे मोबाईल कुठून , कसे व व फक्त रिक्षाचालकांचेच का चोरले याचे उत्तर मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेणारे पोलिस देखील चकीत झाले.मुळची गुजरात येथील त्याची प्रेयसी त्याच्यावर प्रेम करत होती. दोघांचे सुरुवातीला तसे चांगले सुरु होते. काही दिवसांनी त्याच्या प्रेयसीचे एका रिक्षाचालकासोबत सुत जुळले. ती आसिफ यास टाळू लागली व रिक्षाचालकासोबत वेळ देवू लागली. एके दिवशी त्याची प्रेयसी त्या रिक्षाचालकासोबत रफू चक्कर झाली.
तेव्हापासून सर्वच रिक्षाचालक जणू त्याच्या डोक्यात बसले. त्याने संतापाच्या भरात केवळ रिक्षाचालकांनाच रडारवर घेतले. त्याने रिक्षाचालकांचे मोबाईल चोरण्याचा सपाटा लावला. एक एक करता करता त्याने तब्बल 80 रिक्षाचालकांचे मोबाईल चोरले.अखेर तो लष्कर पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. एका रिक्षाचालकाचा राग त्याने सर्वच रिक्षाचालकांवर काढला व त्यांचे मोबाईल चोरण्याचा उद्योग सुरु केला. पुढील तपास लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रशेखर भोसले करत आहेत.