जळगाव : कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह रकमेसह विमा रकमेचा परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी वापर करणा-या दोघांविरुद्ध रावेर येथील समाजसेविका श्रीमती वंदना गायकवाड यांनी रावेर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर येथे श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे. या संस्थेत काम करणा-या कर्मचा-यांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधी आणि विम्याची ठराविक रक्कम स्वयं बिझीनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड या वर्तक नगर ठाणे वेस्ट येथील संस्थेमार्फत बॅंकेच्या माध्यमातून जमा केली जात होती. हा व्यवहार चेकच्या माध्यमातून सुरु होता.
संतोष देशपांडे हे स्वयं बिझीनेश सोल्युशन या संस्थेचे व्यवस्थापक आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार श्रीमती वंदना गायकवाड यांनी वेळोवेळी या संस्थेच्या खात्यात तसेच पंकज अरविंद देशपांदे यांच्या खात्यात वेळोवेळी रक्कम जमा केली. संतोष देशपांडे यांच्या सांगण्यानुसार आतापर्यंत 5 लाख 48 हजार 173 रुपये चेकद्वारे वर्ग झाले आहेत. मात्र संतोष देशपांडे आणि पंकज देशपांडे या दोघांनी ही रक्कम कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह आणि विमा खात्यात जमा केलेली नाही. ही रक्कम दोघांनी स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी वापरली आणि या रकमेचा अपहार केला असा श्रीमती गायकवाड यांचा आरोप आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. आखेगावकर करत आहेत.