जळगाव : मुळ उत्पादनाप्रमाणे हुबेहुब दिसणा-या बनावट उत्पादनाच्या साठ्यावर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरात दोन ठिकाणी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत एकुण 7 लाख 5 हजार 745 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोरेगाव मुंबई येथील नेत्रीका कन्सल्टींग इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे फिल्ड ऑफीसर सिध्देश सुभाष शिर्के यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि. 420 व कॉपी राईट अॅक्ट कलम 51(अ) (ब) 63,64 प्रमाणे या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
जळगाव शहरातील शिरसोली नाका मोहाडी रोड नेहरु नगर येथील जयप्रकाश नारायणदास दारा याच्याकडे असलेल्या चारचाकी वाहनात 3 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामधे इनो सिक्सर, झंडू बाम, आयोडेक्स, हार्पीक पॉवर प्लसच्या बाटल्या, डेटॉल साबन, डव शॅंपुचे पाऊच, सर्फ एक्सलचे पाऊच आदी बनावट मालाचा साठा मिळून आला. याशिवाय गायत्री नगर येथील आकाश राजकुमार बालानी यांच्याकडे देखील बनावट मुद्देमाल मिळून आला आहे. दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एकुण 7,05,745/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनी दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचीन मुंढे, पोना. योगेश बारी, सचीन पाटील, पोका. विशाल कोळी, राहुल रगडे, छगन तायडे, मपोका. राजश्री बावीस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास पोउनी दिपक जगदाळे करत आहेत.