जळगाव : जुन्या वादातून घरात घुसून सामानाची तोडफोड करुन नुकसान तसेच मारहाण करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सुनील रसाल राठोड उर्फ शेंड्या व विशाल पदमसिंह परदेशी उर्फ तांडव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
गोपाल मधुकर चौधरी या चिकन विक्रेत्याचे रचना कॉलनीत घर असून याठिकाणी तो परिवारासह राहतो. तब्येत बरी नसल्यामुळे गोपाल चौधरी हा 14 सप्टेबरच्या सायंकाळी मेडीकल स्टोअरवर गेला होता. त्याचवेळी सुनिल राठोड, विशाल परदेशी अशा दोघांसह त्यांचे साथीदार असे गोपाल चौधरी याच्या घरावर चाल करुन आले. गोपाल चौधरी याच्या घरावर हल्ला करण्यात आला. या घटनेत घरातील टि.व्ही., फ्रिज, दुकानासाठी लागणारे मटेरियल आदी अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले. या सामानात सोन्याची चिप कुठेतरी पडून गेली.
या घटनेची माहिती मिळताच गोपाल चौधरी या चिकन विक्रेत्याने घराकडे धाव घेतली. सुनिल राठोड याने गोपाल चौधरी याच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला. तांडव उर्फ विशाल परदेशी याने उलट्या कोयत्याने गोपाल याच्या पाठीत तसेच पोटात मारहाण केली. सुनिल रसाळ राठोड व त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी इसमाने गोपाल चौधरी यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घराबाहेर उभी असलेल्या बुलेट वाहनाचे नुकसान करण्यात आले.
या घटनेनंतर वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर गोपाल चौधरी याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच सुनील रसाल राठोड उर्फ शेंड्या व विशाल पदमसिंह परदेशी उर्फ तांडव या दोघा हल्लेखोरांना कांचन नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटकेनंतर न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुनील याच्याविरुद्ध यापूर्वी पाच गुन्हे दाखल असून विशाल याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले, छगन तायडे, सुधीर साळवे, इमरान सय्यद, ललित नारखेडे, किरण पाटील, सचिन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.