नाशिक : शासकीय योजनेच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा या गावी समूह परिसरात क्लस्टर विकसित कामाची 35 लाख अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम मिळवून देण्याच्या मोबदल्यात मागणी केलेली चार लाख रुपयांची रक्कम स्विकारतांना चाळीसगाव येथील उप-विभागीय अभियंत्यास शनिवारी रात्री नाशिक येथे ताब्यात घेण्यात आले आहे. ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते असे सार्वजनीक बांधकाम उपविभाग चाळीसगाव येथील लाच घेणा-या उप विभागीय अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार ठेकेदाराने जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातून शासकीय योजनेच्या माध्यमातून समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. या कामाच्या बिलाची 4 कोटी 82 लाख रुपयांची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात तसेच कामाची अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती चार लाख रुपये देण्याघेण्याचे ठरले. मात्र तक्रारदार ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.