विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी)  – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क नसून गुरुवार, दि. २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत ऐनवेळी सहभाग दिला जाणार नाही यांची शाळांनी नोंद घ्यावी अशी माहिती गांधी रिसर्च फाऊंडेशन संस्थेच्यावतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून एका शाळॆतून एकच प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी शाळांनी मराठी वा हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत सादर करणे अपेक्षित असून चित्रपटातील गीते स्वीकारले जाणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटांचा कालावधी दिलेला असेल. संघातील विद्यार्थ्यांची संख्या वाद्य वादकांसह जास्तीत जास्त १२ असावी. गीत सादर करतांना पारंपरिक वाद्यांचा वापर अपेक्षित असून पाश्चात्य वाद्यांना परवानगी नाही. सहभाग नोंदणी करतांना प्रवेशिकेसोबत स्वतंत्र कागदावर संपूर्ण गीत, गीतकार व अन्य माहिती देणे अनिवार्य आहे. 

सहभागी संघातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्या संघांना अनुक्रमे रु. ११ हजार, ७ हजार, ५ हजार व उत्तेजनार्थ रु. २ हजाराची तीन रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात स्पर्धा घेण्यात येईल व स्पर्धेनंतर तेथेच स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. सहभागी संघांनी सकाळी ७ वाजता आयोजित *अहिंसा सद्भावना शांती यात्रेत* सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. आपल्या शाळेच्या संघाची नोंदणी करण्यासाठी व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ या भ्रमध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही पत्रकात कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here