विस हजाराची लाच मागणा-या महावितरण अभियंत्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : विस हजार रुपयांची लाच मागणा-या महावितरण असिस्टंट इंजिनिअर विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालेराव असे या लाच मागणी करणा-या अभियंत्याचे नाव आहे. या घटनेतील तक्रारदार हे सरकारी कंत्राटदार असून सरकारतर्फे फिर्यादी एसीबी जळगावचे पोलिस निरिक्षक अमोल सदाशिव वालझाडे हे आहेत.

जळगाव येथील रहिवासी तक्रारदार यांनी महावितरण स्थापत्य विभागाच्या जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा ता. पाचोरा येथील सब डिव्हीजन ऑफीसच्या वाल कंपाऊंडसह बोरिंग करण्याच्या कामाचा सब कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. या कामाची स्थापत्य कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे यांनी साईट व्हिजीट केली होती. तसेच हे काम बरोबर नसून मुदतीत पुर्ण केले नाही म्हणून तक्रारदारास नोटीस बजावली होती.

त्यानंतर तक्रारदाराने अनिरुद्ध नाईकवाडे यांची त्यांच्या कार्यालयात जावून वेळोवेळी भेट घेतली होती. 9 लाख 65 हजार 371 रुपये मुल्याचे हे काम सुरळीत सुरु राहू द्यायचे असेल तर त्यासाठी कामाच्या मोबदल्यात दहा टक्के याप्रमाणे 1 लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली. त्यामुळे तक्रारदाराने नाईलाजास्तव साठ हजार रुपये दिले होते. त्यानंतर स्थापत्य कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे यांनी उर्वरीत चाळीस हजाराची मागणी केली.

या प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे एसीबी पथकाने वेळोवेळी पंचासमक्ष पडताळणी केली. 12 जून 2023 रोजी तक्रारदारास अभियंता नाईकवाडे यांच्याशी बोलणी करण्यासाठी महावितरण कार्यालयात रवाना करण्यात आले. मात्र त्या दिवशी कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे हजर नव्हते. त्यांचे असिस्टंट इंजीनिअर भालेराव यांची तक्रारदाराने भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात भादली येथील कामाविषयी चर्चा झाली. त्या चर्चे दरम्यान असिस्टंट इंजिनिअर भालेराव यांनी कार्यकारी अभियंता नाईकवाडे यांच्यासाठी विस हजार रुपये लाच देण्यास तक्रारदारास प्रोत्साहीत केले. तसेच स्वत:साठी विस हजार लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार देण्यास नकार दिला. अखेर सरकारतर्फे फिर्यादी होत असिस्टंट इजिनिअर भालेराव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसिबी पो.नि. एन. एन. जाधव हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here