जळगाव/अहमदनगर : नातीक कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, नागेश कुंज्या चव्हाण, लिंब्या हाब-या काळे या चौकडीचा लोकांची लुटालुट करण्याचा उद्योग होता. नकली सोने असली सोने असल्याचे भासवून ते कमी भावात विक्री करण्याच्या बहाण्याने ही चांडाळचौकडी ग्राहकांना जाळ्यात ओढाण्याचे काम करत होती. ग्राहकांचा विश्वास संपादन करुन सावज रुपात पैसे घेवून आलेल्या ग्राहकाची लुट करणे हा या चौकडीचा उद्योग होता.
या कामी त्यांची गुन्हे करण्याची एक पद्धत (मोड्स ऑपरेंडी) ठरलेली होती. ही चौकडी त्यांच्या ताब्यातील मोबाईलवरुन कोणत्याही क्रमांकावर डायल करत असत. मनाला पटेल त्या क्रमांकावर फोन केल्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर ट्रू कॉलरच्या मदतीने पलीकडील मोबाईल धारकाचे नाव त्यांना दिसत असे. एकदा का पलीकडील मोबाईलधारकाने फोन उचलला म्हणजे या चौकडीचा गोड बोलून फसवणूकीचा उद्योग सुरु होत असे.
खोदकाम करतांना आमच्या हाती सोन्याचे घबाड लागले आहे. आम्ही अडचणीत आहोत. आमच्याकडून तुम्हाला अगदी कमी भावात सोने मिळेल. तुम्ही एकदा आम्हाला भेटून आमच्याकडून सोने घ्या असा तगादा ते पलीकडून बोलणा-या मोबाईल धारकाकडे लावत असत. कुणी प्रतिसाद दिला नाही तरी ही चांडाळ चौकडी त्या मोबाईल धारकाला सारखा सारखा फोन लावून सोने खरेदीसाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत असत.
ग्राहक आल्यानंतर ते त्याला नकली सोन्याचा साठा दाखवत असत. त्यातील एखादे असली सोने अगदी कमी किमतीत घेण्यास भाग पाडत असत. या सोन्याची कोणत्याही सराफाकडून खात्री अर्थात परिक्षा करुन घेण्यास ते सांगत असत. पहिल्या भेटीत ते ग्राहकाला असली सोने देत असत. ते सोने खरे असल्याची खात्री झाल्यानंतर ग्राहकाचा या टोळीवर विश्वास बसत असे.
एकदा विश्वास बसल्यानंतर ही चौकडी अर्थात लुटारु टोळी ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने खरेदीसाठी आल्यानंतर त्याच्यावर सरळ सरळ हल्ला करुन त्याला लुटून घेत असत. मोह हे दुखा:चे कारण असते. मनुष्यप्राणी मोहाला बळी पडतो हा निसर्गाचा नियम आहे. पाच दुर्गुणापैकी मोह हा एक दुर्गुण आहे. त्या मोहाच्या बळावर बदमाश मनुष्य चांगल्या मनुष्याला बिघडवण्यासह फसवण्याचे काम करत असतो.
मनुष्य मोहाला बळी पडला म्हणजे कमी अधिक प्रमाणात विनाशाच्या दिशेने दृश्य अथवा अदृश्य स्वरुपात वाटचाल करत असतो. नातीक कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, नागेश कुंज्या चव्हाण हे तिघे भाऊबंद होते. तिघे भाऊ अहमदनगर जिल्हयाच्या श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील लहाकर मळा येथील रहिवासी होते. लिंब्या हाब-या काळे हा देऊळगाव येथील रहिवासी होता.
एकदा या लुटारु टोळीने असाच नेहमीच्या सरावाने एक फोन लावला. तो फोन जळगाव येथील नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे या तरुणाला लागला. जळगाव येथील हरिविठ्ठल नगर भागात नरेश सोनवणे हा रहात होता. नेहमीच्या फसवणूक करण्याच्या सवयीने नरेश सोनवणे यास पलिकडून सांगण्यात आले की आम्हाला खोदकाम करतांना सोन्याचे दागिने सापडले आहेत.
आम्ही अडचणीत असून आम्हाला हे दागिने कमी किमतीत विकायचे आहे. तुम्ही एकदा आमच्याकडे नगर जिल्हयात या आणि आमच्याकडील दागिने बघून घ्या. तुम्ही दागिने घेतलेच पाहिजे असा आमचा आग्रह नाही. मात्र एकवेळा आम्हाला भेटा आणि दागिने बघून खात्री करा. त्यानंतर या टोळीने नरेश सोनवणे यास दररोज फोन लावण्याचा सपाटा लावला. जवळपास एक महिना सोने घेण्यासाठी बोलावण्याचा फोन नरेश यास येत होता. त्यामुळे त्याने हा प्रकार गल्लीतील प्रेमराज रमेश पाटील, कल्पना किशोर सपकाळे, आशाबाई जगदीश सोनवणे आदींना सांगितला.
महिलावर्गाला सोन्याचा हव्यास असतो हे सर्वश्रृत अर्थात जगजाहीर आहे. कमी किमतीत सोने मिळत असल्याचे समजताच कल्पना सपकाळे या महिलेला सोन्याचा मोठ्या प्रमाणावर मोह झाला. तिने सर्वांना कमी किमतीत सोने घेण्यासाठी जाण्यासाठी तयार केले. सर्वांना तिने लवकर सोने घेण्यासाठी चला म्हणून आग्रह सुरु केला. कल्पनाबाईच्या सततच्या आग्रहामुळे सर्वांनी मिळून भाडे तत्वावर किलोमीटरच्या हिशेबाने चारचाकी वाहनाने अहमदनगर जिल्हयात जाण्याचे ठरवले.
त्यामुळे नरेश सोनवणे व आशाबाई सोनवणे या मायलेकांनी देखील जाण्यासाठी भाड्याच्या पैशांची व सोने विकत घेण्यासाठी लागणा-या पैशांची जुळवाजुळव सुरु केली. सर्व जण कमी किमतीत सोने घेण्यासाठी जात असल्याचे बघून प्रेमराज पाटील याने देखील त्यांच्यासमवेत जाण्याची तयारी केली. अहमदनगर जिल्हयात सोने खरेदीसाठी योगेश मोहन ठाकुर याच्या वाहनाने जाण्यास सर्वजण गुरुवारी जाण्यास निघाले. गुरुवार हा चांगला व शुभ दिवस असल्याचे सर्वांनी मनाशी म्हणत देवाचे नाव घेत प्रवासाला सुरुवात केली.
सोने ताब्यात मिळू दे, सुखरुप परत येवू दे अशी चौघांनी देवाला मनातल्या मनात विनवणी सुरु केली. आपण आपले गाव सोडून लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात आहोत. तसेच परतीच्या प्रवासात आपल्याजवळ सोने राहील त्यामुळे कदाचीत आपल्यावर हल्ला होवू शकतो असा मनाशी विचार करत नरेश सोनवणे याने आपल्या कब्जात एक चाकू घेतला होता.
आपले व आपल्या सोबत असणा-या सर्वांचे वेळ प्रसंगी रक्षण करण्यासाठी नरेश सोनवणे याने चाकू आठवणीने सोबत घेतला होता. आज सायंकाळी सावज आपल्या जाळ्यात येणार आहे याची माहिती नातीक कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, नागेश कुंज्या चव्हाण, लिंब्या हाब-या काळे या लुटारुंना समजली होती. त्यांचे नरेश सोनवणे याच्याशी मोबाईलवरील संभाषणातून संपर्क सुरु होता. ही लुटारु टोळी अहमदनगरच्या दिशेने येणा-या ग्राहक वजा सावजाचे लोकेशन घेत होती. चार लाख रुपयात पावशेर अर्थात 250 ग्रॅम सोने खरेदी विक्रीचा व्यवहार ठरला होता.
त्यामुळे येत असलेल्या पार्टीकडे लाखो रुपये नक्की असणार याची खात्री अहमदनगर येथील बदमाश टोळीला होती. त्यामुळे ते त्यांना लुटण्याच्या तयारीत होते. त्यांच्या आजुबाजुला कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांचे साथीदार लपून बसलेले होते. “देवून टाका देवून टाका” हे वाक्य त्यांचा पासवर्ड होता. हे वाक्य म्हटल्यावर सर्वांनी मिळून जळगावहून आलेल्या सर्वांवर हल्ला करुन लुटालुट करण्याचा त्यांचा डाव होता. ठरल्यानुसार अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्यावर भेटून व्यवहार पार पाडण्याचे ठरले होते.
या निर्जन ठिकाणी कमी किमतीत सोने घेण्यासाठी नरेश व त्याची आई आशाबाई सोनवणे, कल्पना सपकाळे, प्रेमराज पाटील व वाहन चालक योगेश ठाकुर असे सर्वजण विसापूर फाट्यावर चार वाजता दाखल झाले. आलेल्या दोघा महिला व तिघा पुरुषांजवळ रोकड असल्याची खात्री नातीक कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, नागेश कुंज्या चव्हाण व लिंब्या हाब-या काळे यांना झाली होती.
कल्पनाबाई सपकाळे हिच्या ताब्यातील 2 लाख 95 हजार रुपये मोजून घेतल्यानंतर त्यांना सोने देण्याएवजी त्यांनी “देवून टाका देवून टाका” हा पासवर्ड मोठ्याने बोलण्यास सुरुवात केली. देवून टाका असे दोन वेळा म्हटल्यावर आजूबाजूला दबा धरुन बसलेले त्यांचे साथीदार धावत धावत आले. दबा धरुन बसलेल्या सर्वांनी मिळून जळगाव येथून आलेल्या सर्वांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.
काही क्षणातच त्या जागेला रणांगणाचे स्वरुप प्राप्त झाले. आता आपण लुटले जात असल्याचे दिसताच दोन्ही महिला घाबरल्या. त्यांनी आपल्या हातातील रोख रकमेची पिशवी दोन्ही हातांनी लपवत दाबून धरण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र हल्लेखोरांनी सर्वांना मारहाण करत त्यांच्या ताब्यातील मोबाईल, रोख रक्कम व अंगावरील दागीने काढून घेतले. आता आपला जीव आणि ताब्यातील रोकड वाचवण्यासाठी नरेशने आपल्या ताब्यातील चाकू बाहेर काढला. मागचा पुढचा विचार न करता त्याने एकामागून एक असे चौघांवर चाकूचे सपासप वार सुरु केले.
एकामागून एक असे नातिक, श्रीधर व नागेश हे तिघे भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांचा साथीदार लिंब्या काळे याच्यावर देखील नरेशने चाकूचे वार करत त्याला घायाळ केले. एकामागून एक असे चौघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून इतर हल्लेखोर घाबरुन पळून गेले. आता येथून लवकरात लवकर पलायन करण्याचे सर्वांनी ठरवले. आलेल्या सर्वांनी तात्काळ जळगावचा परतीचा मार्ग धरला. त्यानंतर काही वेळातच चौघा जखमींनी आपका दम तोडला. या हल्ल्यादरम्यान घाईगर्दीत नरेश सोनवणे याच्या खिशातील बॅंकेचे एटीएम कार्ड घटनास्थळावर पडून गेले. घाईगडबडीत ते एटीएम कार्ड पडल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही कारण प्रत्येकाला आपला जीव वाचवून परतण्याची घाई झाली होती.
सर्व जण घटनास्थळावरुन पळून गेल्यानंतर या घटनेची माहीती चोघा मयतांच्या नातेवाईकांना समजली. चार जणांच्या हत्येची धक्कादायक बातमी बघता बघता परिसरात समजण्यास वेळ लागला नाही. दरम्यानच्या कालावधीत नरेश सोनवणे, त्याची आई आशाबाई सोनवणे, कल्पना सपकाळे, प्रेमराज पाटील, वाहन चालक योगेश ठाकूर असे सर्वजण जळगावला रातोरात गुपचूप परत आले. जणू काही झालेच नाही असा पवित्रा सर्वांनी घेत मौन बाळगले.
सोने तर मिळाले नाही मात्र फार मोठा अनर्थ घडला होता. या प्रकरणी मयत झालेल्या तिघा भावांची आई अक्षदा कुंजीलाल चव्हाण हिने बेलवंडी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. अक्षदा चव्हाण हिने दिलेल्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. ३३१/२०२० भा.द.वि. ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत संशयीत आरोपी म्हणून अक्षदा चव्हाण हिने अक्षय उंबन्या काळे, मिथून उंबन्या काळे व इतर चार ते पाच अनोळखी इसम अशांची नावे दिली.
जुन्या वादाच्या कारणावरुन या सर्व संशयीतांनी नातीक कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, नागेश कुंज्या चव्हाण व लिंब्या हाब-या काळे अशा चौघांची धारदार शस्त्राने छातीवर, पोटावर वार करुन हत्या केल्याचे अक्षदा चव्हाण हिने फिर्यादीत म्हटले. एकाच वेळी चार जणांची सामुहिक हत्या झाल्याची घटना अहमदनगर जिल्हयाचे पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी गांभीर्याने घेतली. स्वत: पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी आपले सहकारी अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर पाटील, कर्जत उप विभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार, बेलवंडी पोलिस स्टेशनचे पो.नि. दौलत जाधव अशांसह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
तपासकामी त्यांनी अधिकारी वर्गास योग्य त्या सुचना दिल्या. गुन्हा घडला त्याठिकाणी बारकाईने निरिक्षण केल्यानंतर घटनास्थळाच्या आजुबाजूला केलेल्या चौकशीत व फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीत पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांना तफावत आढळून येत होती. फिर्यादी काहीतरी चुकीची माहिती देवून आपली दिशाभूल तर करत नाही अशी शंका उपस्थित सर्वच अधिकारी वर्गाला येत होती. या गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, बेलवंडी पोलिस स्टेशनचे पो.नि. अरविंद माने तसेच श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पो.नि. दौलत जाधव अशा तिघा अधिका-यांच्या निगरानीखाली वेगवेगळे तपास पथक तयार करुन ते तपासकामी रवाना करण्यात आले.
तपास पथकाने विविध वेशभुषेत वेशांतर करुन आजुबाजुला कानोसा घेत तपास सुरु केला. चौकाचौकात जावून लोकांच्या चर्चेतून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मयताच्या इतर नातेवाईकांना विश्वासात घेवून विचारपुस करण्यात आली. त्यात पोलिस पथकाला असे समजले की सदरचे हत्याकांड हे मयत व त्यांच्या साथीदारांनी स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने जळगावच्या महिला व पुरुषांना ग्राहक म्हणून बोलावले होते. ग्राहकांना खात्री पटण्यासाठी काही प्रमाणात खरे सोने देवून चार लाख रुपयात अडीचशे ग्रॅम सोने खरेदी विक्रीचा व्यवहार ठरला होता.
ठरल्यानुसार गुरुवार २० ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगाव येथील महीला व तीचे साथीदार असे सर्वजण विसापूर फाटयावर सोने खरेदी साठी आले होते. घटनेच्या वेळी मयत व सोन्याचे खरेदीदार यांच्यात झटापट झाली. मयतांनी ग्राहकांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आपले दागिने, पैसे, मोबाइल व जीव वाचवण्यासाठी एकाने चाकूने मयतांना ठार केले होते. घटनास्थळावर पोलिसांना बॅकेचे एक एटीएम कार्ड मिळाले होते. ते एटीएम कार्ड जळगावचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या हत्येचा संबंध जळगावशी असल्याचे स्पष्ट झाले होते.
अहमदनगर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती देत सहकार्याची मागणी केली. त्यानुसार पुढील तपासकामी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम यांच्यात संवाद झाला. दोघा पोलिस निरिक्षकांनी आपापसात केलेल्या संवादातून पुढील तपासकामाला वेग आला.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे बापू रोहोम यांनी तांत्रीक पद्धतीने तपास केला असता २० ऑगस्ट रोजी जळगावहून अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील विसावा फाट्यावर गेलेले सर्व जण हे जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली. अहमदनगर जिल्हयातून श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे स.पो.नि.राजेंद्र सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरिक्षक गणेश इंगळे, बेलवंडी पोलिस स्टेशनचे उप निरिक्षक बोराडे, पो.हे.कॉ. सुनिल चव्हाण, अंकूश ढवळे, विजयकुमार वेठेकर, बाळासाहेब मुळीक, पोलिस नाईक संदीप पवार, संतोष लोढे,
विशाल दळवी, रवि सोनटक्के, विश्वास बेरड, पो.कॉ.संदीप दरंदले, विजय घनेधर, मच्छिन्द्र बर्डे, कमलेश पाथरुट, शिवाजी ढाकणे, रविन्द्र धुंगासे, रोहीत मिसाळ, महिला पोलिस नाईक सिरसेना काळे, चालक पो.हे.कॉ.संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे, देविदास काळे, भगवान धुळे आदींचे पथक जळगावला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची भेट घेतली. त्यानंतर डॉ. उगले यांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम यांची भेट घेतली.
पो.नि. बापू रोहोम यांनी आपले अनुभवी व शहराची चांगल्या प्रकारे माहिती असलेले माहितगार सहकारी एकत्र बोलावले. त्यात सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, संजय सपकाळे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अलका शिंदे यांचा समावेश केला. या सर्व पथकाच्या सोबत अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या पथकाला तपासकामी रवाना केले. या पथकाने तहानभुक विसरुन दिवसभर तपासकामी हरिविठ्ठल नगर परिसर पिंजून काढला.
दिवसभर शोध मोहीम राबवून नरेश सोनवणे, आशाबाई सोनवणे, कल्पना सपकाळे, प्रेमराज पाटील व योगेश ठाकुर यांना ताब्यात घेतले. आम्ही सोने विकत घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात गेलो होतो मात्र खून आम्ही केला नाही असा पाढा त्यांनी वाचण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सर्वांनी आपला गुन्हा कबुल करत सर्व घटनाक्रम कथन केला.
अहमदनगर येथून आलेल्या पथकाच्या ताब्यात सर्व पाचही संशयीत आरोपींना देण्यात आले. त्या पाचही जणांना घेवून अहमदनगरच्या पथकाने त्यांना तेथील पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या समोर हजर केले. तेथे पुन्हा त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. २० ऑगस्ट रोजी दुपारी जळगाव येथून पाचही जण अहमदनगर जिल्हयाच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटयाजवळ गेले होते.
स्वस्तात सोने खरेदीच्या लालसेने सर्व जण गेले होते. मात्र त्याठीकाणी त्यांची लुटमार झाली तसेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात हल्लेखोर तिघे भाऊ आणि त्यांचा सहकारी असे चौघे जण जखमी व मृत्युमुखी पडले. सोन्याचा मोह अटक करण्यात आलेल्या पाचही जणांना जसा महागात पडला तसा हल्ल्यात मरण पावलेल्या चौघांना तर चांगलाच महाग पडला. त्यांना तर थेट यमसदनी जावे लागले. मयत चौघे जण व त्यांचे नातेवाईक तसेच फिर्यादी अक्षदा यांनी कल्पना सपकाळे या महिलेकडून २,९५,००० रुपये मोजून घेतल्यानंतर चौघा मयतांनी मोठ्याने ” देवून टाका, देवून टाका ” असे ओरडण्यास सुरुवात केली.
देवून टाका असे म्हटल्याबरोबर लपून बसलेले इतर सर्वांनी जळगावच्या सर्वांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूच्या हल्ल्यात नातीक, श्रीधर, नागेश व लिंब्या असे चौघे मृत्यूमुखी पडले. या गुन्ह्यातील मुख्य हल्लेखोर नरेश जगदिश सोनवणे, कल्पना किशोर सपकाळे, आशाबाई जगदिश सोनवणे, प्रेमराज रमेश पाटील सर्व रा. सिध्दार्थ सोसायटी, तडवी गल्ली, हरी विठ्ठल नगर यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्यांना सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत उप विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी संजय सातव हे करत आहेत. स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून बोलावून जवळची रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा एवज दरोडा टाकून चोरुन नेल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस स्टेशनला स्वतंत्रपणे नोंदवण्यात आली.
सदर फिर्याद बेलवंडी पोलिस स्टेशनला कल्पना सपकाळे या महिलेच्या फिर्यादीनुसार गु.र.नं. ३४१/२०२०, भा.द.वि. कलम ३९५ नुसार दाखल करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास बेलवंडी पोलिस स्टेशनचे पो.नि.अरविंद माने करत आहेत. अहमदनगर पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर पाटील, कर्जत उप विभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, बेलवंडी
पोलिस स्टेशनचे पो.नि. अरविंद माने, श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पो.नि. दौलत जाधव यांनी हा तपास पुर्ण केला. मात्र त्यांची ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम व त्यांच्या सहकार्याने पुर्णत्वाला गेली. या पथकात पो.हे.कॉ.सुधाकर अंभोरे. अश्रफ शेख, संजय सपकाळे, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, जितेंद्र पाटील, महिला पोलिस नाईक अलका शिंदे यांच्या अनमोल परिश्रमाने फळाला लागली.
स्वस्तात सोने विक्री बाबत कोणत्याही व्यक्तीचा फोन आल्यास तात्काळ त्या क्रमांकाची माहीती पोलीसांना द्यावी. तसेच सोने खरेदीस बळी पडू नये असे आवाहन पोलिस दलाकडून या निमीत्ताने करण्यात आले आहे.