जळगाव : पदोन्नतीची थकीत रक्कम मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून बारा हजारापैकी सात हजाराच्या लाचेचा पहिला हप्ता स्विकारणा-या आश्रमशाळेच्या ग्रंथपालास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. श्रीकांत गुलाब पवार असे माध्यमीक आश्रम शाळा करगाव ता. चाळीसगाव येथील लाच स्विकारणा-या ग्रंथपालाचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदारास त्याची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणायची होती. या कामी पुढाकार घेणा-या श्रीकांत पवार या ग्रंथपालाने तक्रारदाराकडून अगोदर फोन पे च्या माध्यमातून पंधरा हजार रुपये घेतले होते. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक येथून तक्रारदाराच्या पदोन्नतीची थकीत रक्कम 85,519 रुपये मंजूर करून आणून देतो असे ग्रंथपालाने तक्रारदारास म्हटले. त्यासाठी फरकाचा बिलाच्या 16 % प्रमाणे पंचासमक्ष ग्रंथपाल श्रीकांत पवार याने बारा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या लाचेच्या रकमेचा सात हजार रुपयांचा पहिला हप्ता श्रीकांत पवार याने एसीबीच्या पंचासमक्ष स्विकारला. सात हजार रुपये स्विकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख, सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहायक फौजदार सुरेश पाटील, हे.कॉ. रविंद्र घुगे, महिला हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने, प्रदीप पोळ, पो.कॉ. सचिन चाटे, पो. कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.