जळगाव : ४ जानेवारी १९२४ मध्ये अमरावती येथे जन्म झालेले प्रख्यात संगीत नाटककार श्री विद्याधर गोखले यांचं हे जन्मशताब्दी वर्ष सं. सुवर्ण तुला, सं. पंडितराज जगन्नाथ, सं. मंदार माला, सं. मदनाची मंजिरी, सं. जय जय गौरीशंकर, सं. बावनखणी, सं. स्वरसम्राज्ञी इ. यशस्वी नाटकांचे लेखन करून ती अजरामर तर झालीच परंतु मराठी रसिकांच्या मनावर या संगीत नाटकांचे व त्यामधील नाट्यपदांच गारुड आजही कोरलं गेलं आहे. ही अजरामर नाटक साधारणपणे १९६० ते १९७३ या कालावधीत लिहिली गेली आहेत. अशा या महान नाटककाराचे हे जन्मशताब्दी वर्ष. हे वर्ष साजरं करताना चांदोरकर प्रतिष्ठानानं विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने “विद्याधर गीतरंग” या वैशिष्ट्यपूर्ण नाट्य गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलं आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता कांताई सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमास भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन तसेच श्री. अशोक भाऊ जैन व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
रविवारी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास उपविभागीय अधिकारी व प्रांत श्री महेश सुधळकर, मेजर नानासाहेब वाणी, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ निशा भाभी जैन, तसेच बेटी बचाओ बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, त्याचप्रमाणे उद्योजक श्री किरण बेंडाळे यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सौ. शुभदा दादरकर यांची असून मुंबईचे प्रतिथयश गायक कलावंत श्री. ज्ञानेश पेंढारकर, सौ. नीलाक्षी पेंढारकर, प्राजक्ता जोशी, व निमिष कैकाडी यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार असून साथ संगत धनंजय पुराणिक (तबला) व वरद सोहनी (ऑर्गन) हे करणार आहेत. चुकवू नये अशा या विद्याधर गोखले जन्मशताब्दी कृतज्ञता सोहळ्यास तमाम जळगावकर रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी विनंती स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व विद्याधर गोखले नाट्यसंगीत प्रतिष्ठानने केली आहे. कार्यक्रम ठीक ७ वाजता सुरू होईल, रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे अशी विनंती ही या निमित्ताने करण्यात आली आहे.