जळगाव : महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार यांना सत्काराच्या रुपात दिलेली शाल आणि श्रीफळ काय परत घेणार? असे म्हणत जळगाव आकाशवाणी केंद्राच्या प्रमुखांनी आपली चुक मान्य केली आहे. देवयानी गोविंदवार या एरंडोल तालुक्यातील खडके येथील मुला मुलींच्या बालगृहात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील संशयीतापैकी एक संशयीत आरोपी आहेत. महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार यांचा गेल्या काही महिन्यापुर्वी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जवळपास बारा ते तेरा वक्त्यांचा सत्कार झाला होता. त्यात देवयानी गोविंदवार यांचा देखील सत्कार झाला होता. आपल्याला एरंडोल येथील घटनेचा तपशील अगोदर माहिती असता तर आपण त्यांचा सत्कार केला नसता असे देखील सांगण्यात आले आहे. पोलिस टाइम्स प्रतिनिधीसोबत मोबाईलवर मुलाखतीदरम्यान बोलतांना अधिका-यांनी याबाबत माहिती दिली.
एरंडोल तालुक्यातील खडके येथील मुला मुलींच्या बालगृहात झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना गेल्या ऑगस्ट महिन्यात प्रकाशझोतात आली. या घटनेमुळे राज्यभर खळबळ माजली. या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्यात महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार यांचे नाव संशयीत आरोपींच्या यादीत समाविष्ट आहे. असे असतांना त्यांचा आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे झालेला सत्कार अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला. याप्रकरणी जळगाव आकाशवाणी केंद्र प्रमुखांनी आपली चुक मान्य केली आहे. दिलेली शाल व श्रीफळ काय परत घेणार? असे देखील सांगण्यात आले. महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदावर देवयानी गोविंदवार यांची नियुक्ती अद्याप कायम आहे. प्रशासनाच्या वरदहस्ताने त्या अद्याप पदावर कायम असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही महिन्यापुर्वी आकाशवाणी जळगाव केंद्राचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. आकाशवाणी जळगाव केंद्रात ज्या वक्त्यांच्या रेकॉर्डींग उपलब्ध असतात त्या वक्त्यांना (टॉकर्स) कार्यक्रमात बोलावले जाते. देवयानी गोविंदवार या बाल समुपदेशन या विषयावर बोलत असतात. त्यामुळे त्यांना बोलावण्यात आले होते. बालकांनी पालकांसोबत कसे वागावे या विषयावर त्यांचे टॉक होते. जळगाव आकाशवाणी केंद्र हा सरकारी मिडीया आहे. या आकाशवाणी केंद्रामार्फत मनोरंजन, शैक्षणीक आणि माहिती या विषयावर आधारीत कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. देवयानी गोविंदवार यांच्याबद्दल एरंडोल येथील दाखल गुन्ह्याची आपल्याला कल्पना नव्हती असे केंद्र प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.