अल्पवयीन मुलीची छेडखानी, पालकांना मारहाण – दोघा टवाळखोरांविरुद्ध गुन्हा

जळगाव : अल्पवयीन मुलीची वारंवार छेडखानी होत असल्याचे निदर्शनास आल्याने जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या पालकांना मारहाण करणा-या दोघा टवाळखोरांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित सुनिल पटेल आणि चेतन सुनिल पटेल अशी दोघा टवाळखोरांची नावे आहेत. जळगाव शहरातील रिंग रोड स्थित डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या दवाखाना परिसरातील बांधकामाच्या साईटवर हा नेहमीचा प्रकार झाला होता. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या सहकार्याने मुलीने जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल होत गुन्हा दाखल केला आहे.

या बांधकामावर एक मजूर वॉचमनचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवतो. वॉचमन असलेल्या या कर्त्या पुरुषाला दोन मुली व एक मुलगा आहे. मोठ्या अल्पवयीन मुलीची परिसरातील मित पटेल आणि चेतन पटेल हे दोघे टवाळखोर छेडखानी करत होते. या अल्पवयीन मुलीकडे बघून डोळे मिचकावणे, अश्लिल हातवारे करणे, शिटी मारणे आदी प्रकार नित्याचे झाले होते.

मुलीच्या छेडखानीचा तिच्या वडीलांनी दोघांना जाब विचारला असता त्यांना दोघांसह त्यांचे वडील व एक साथीदार अशा चौघांनी शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. लाकडी दांडक्याने होत असलेली मारहाण बघून मुलीच्या आईने मध्यस्ती केली असता तिला विटांनी मारहाण करण्यात आली. दरम्यान झालेला प्रचंड गोंधळ बघून गल्लीतील लोक जमा झाले. या प्रकाराची माहिती अधिकार तथा सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या मदतीने पिडीत मुलगी व तिचे आईवडील जिल्हापेठ पोलिस स्टेशनला हजर झाले. मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here