जळगाव : दुरुस्त केलेल्या गाडीत पुन्हा बिघाड झाल्याने गॅरेजवर आलेल्या ग्राहकाने आत्ताच माझी मोटार सायकल दुरुस्त करुन दे असा तगादा लावल्याने झालेल्या वादातून गॅरेज मालकाचा खून झाला. या खूनाच्या घटने प्रकरणी गॅरेज मालकाचा खून करणा-या मोटार सायकल चालकाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीत बळाळ कसबे या गावी महेश संतोष बोरसे याचे मोटार सायकल दुरुस्तीचे शिवशक्ती मोटार नावाचे गॅरेज आहे. या गॅरेजवर ज्ञानेश्वर निंबा मासरे याने मोटार सायकल दुरुस्तीचे काम केले होते. मात्र त्याच्या मोटार सायकलमधे पुन्हा बिघाड झाला. त्यामुळे तो गॅरेजवर पुन्हा आला. माझी मोटार सायकल आत्ताच्या आता दुरुस्त करुन दे असा तगादा ज्ञानेश्वर मासरे याने महेश बोरसे याच्याकडे लावला. माझे काम सुरु आहे, थोडे थांब तुझी मोटार सायकल दुरुस्त करुन देतो असे महेश बोरसे याने ज्ञानेश्वर मासरे याला म्हटले. मात्र ज्ञानेश्वर मासरे याला धीर नसल्यामुळे त्याने वाद घालून महेश बोरसे यास जमीनीवर आपटून जीवे ठार केले.
वाद सुरु असतांना महेश बोरसे याचे वडील वाद सोडवण्यास आले होते. त्यांना देखील ज्ञानेश्वर याने शिवीगाळ व दमदाटी केली होती. या घटनेप्रकरणी मयत महेश बोरसे याचे वडील संतोष तुकाराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. विष्णू आव्हाड करत आहेत.