जळगाव : संगमनेर येथील दुय्यम कारागृहाचे गज कापून चारचाकी वाहनाने पळून जाणा-या चौघा आरोपींना मदत करणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. पळून जाणा-या चौघांची त्यांना मदत करणा-या तिघांसोबत कारागृहात ओळख झाली होती. कलीम अकबर पठाण, हालीम अकबर पठाण (दोघेही रा. संगमनेर), प्रथमेश राऊत (घुलेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
8 नोव्हेंबरच्या सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. कारागृहाचे गज कापून पळून गेलेल्या चौघांना दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पकडण्यात आले होते. पलायन करणा-या आरोपींना चारचाकी वाहन उपलब्ध करून देणे, वाहनाची नंबर प्लेट बदलणे तसेच त्यांच्यासाठी पैशांची व्यवस्था करण्याचे काम अटकेतील तिघांनी केले होते.
कारागृहाचे गज कापून पळून जाणारे राहुल देविदास काळे, रोशन रमेश ददेल, अनिल छबू ढोले, मच्छिंद्र मनाजी जाधव हे चौघे गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आहेत. संगमनेर शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी भा.दं.वि. कलम 224 नुसार गुन्हा दाखल आहे. त्यात कलम 307, 120 ब तसेच शस्त्र अधिनियम कलम 3/25 ची वाढ करण्यात आली आहे.