वाळूची अवैध वाहतुक आणि साठा – डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी चालकांविरुद्ध गुन्हा

जळगाव : वाळूचा अवैध साठा आणि अवैध वाहतुक करणा-या दोघा डंपरसह एक ट्रॅक्टर आणि एक जेसीबी अशा चौघा वाहनांच्या चालक व मालकाविरुद्ध कासोदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या घटनेचे चित्रीकरण महसुल प्रशासनाला दिल्यानंतर अखेर या कारवाईला सुरुवात झाली. कासोदा पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई होईपर्यंत माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी आपला पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर महसुल प्रशासनाच्या वतीने उत्राण विभागाचे तलाठी शेख शकील अहमद अयाजोद्दीन यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी अवैध वाळू साठा आणी अवैध वाहतुक प्रकरणी व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर एरंडोल तहसीलदार यांनी तलाठी शेख शकील यांना फोनद्वारे माहिती देत पुढील कारवाईच्या सुचना दिल्या. गिरणा नदीपात्रातून वाळूची उचल आणि साठवणूक होत असल्यामुळे महसुल प्रशासनाची दिवसाढवळ्या फसवणूक सुरु होती. उत्राण ग्रामपंचायत गट क्रमांक चार मधे सुमारे 72 हजार रुपये किमतीची 120 ब्रास वाळू याठिकाणी आढळून आली. विनापरवाना बेकायदा वाळू वाहतुक करणा-या चौघा वाहनांच्या अज्ञात चालक – मालकांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here