जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी वापरत असलेल्या वाहनाची पाळेमुळे आता खणून काढली जात आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वापरत असलेली कार एमएच – 19 ईए 8429 आता चौकशीच्या गर्तेत सापडली आहे. या वाहनाच्या मुळ मालकास प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनिल गुरव यांनी एक नोटीस जारी केली आहे. भुसावळ येथील आक्स इरेक्टोरर्स प्रा. लि. मु.पो. कस्तुरी पॅलेस विकली मार्केट भुसावळ यांच्या नावे ही नोटीस देण्यात आली आहे. जळगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी हा विषय खणून काढल्यानंतर पाठपुराव्याने ही नोटीस निघाली असून वास्तव जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली आहे.
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वापरत असलेल्या एमएच 19 – ईए 8429 या क्रमांकाच्या वाहनाची खासगी संवर्गात नोंदणी झाली आहे. असे असतांना देखील हे वाहन मेसर्स दिया कार, औरंगाबाद यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव यांना भाडेतत्वार दिले असल्याची तक्रार सहायक प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झाली आहे.
या कार्यालयाने या वाहनाचे कार्यालयीन अभिलेख तपासले असता, सदर वाहन आक्स इरेक्टोरर्स या मालकीच्या नावे नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील हे वाहन मे. दिया कार एजन्सी, औरंगाबाद यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव यांना भाडे तत्वावर दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव यांनी हे वाहन जिल्हाधिकारी, जळगाव यांना वापरासाठी दिले असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार पी गुप्ता यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे.
खासगी संवर्गातील मालकीचे वाहन व तशी नोंदणी झाली असतांना आपण हे वाहन कोणत्या आधारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना भाडेतत्वावर दिले? असा प्रश्न या नोटीसीच्या माध्यमातून वाहन मालकास विचारण्यात आला आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत याबाबतचा खुलासा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास या चर्चित वाहनावर मोटार वाहन कायदा, 1989 च्या कलम 66, कलम 192 (अ) व इतर अनुषंगिक कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसीच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे.