जळगाव : चोरीच्या मोटार सायकलीचा तपास सुरु असतांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यातील व पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून चार मोटार सायकलींचा तपास उघडकीस आला आहे. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साबळे (रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. एमआयडीसी, जिल्हापेठ आणि नंदुरबार अशा तिघा पोलिस स्टेशनचे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड झाले असून चार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी मेहरुण तलाव भागातून एक मोटार सायकल चोरी झाली होती. याप्रकरणी दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक करत होते. तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत उर्फ चोर बाप्या हा चोरीच्या मोटार सायकली वापरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी अधिक तपासकामी दोन वेगवेगळे पथक त्याच्या मागावर पाठवले. या पथकाने त्याचा शोध घेत पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील मोटार सायकलीच्या कागदपत्रांची त्याला विचारणा करण्यात आली. ताब्यातील मोटार सायकल आपण नंदुरबार येथून चोरी केल्याचे त्याने कबुल केले.
सखोल चौकशीअंती त्याने अजून तिन मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. त्याच्या कब्जातून नंदुरबार, जिल्हा पेठ आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या एकुण चार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ. अल्ताफ पठाण, पोहेकॉ, गणेश शिरसाळे, पो.ना. किशोर पाटील, पो.ना. योगेश बारी, सचीन पाटील, विकास सातदिवे, पो.कॉ. छगन तायडे, ललीत नारखेडे यांनी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.