जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील यावल आणि कासोदा येथील प्रत्येकी एक अशा दोघा गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यावल पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे (रा. अट्रावल ता. यावल) आणि कासोदा पोलिस स्टेशन हद्दीतील भिकन रमेश कोळी (रा. उत्राण ता. एरंडोल) अशी दोघांची नावे आहेत.
दिवाकर तायडे याच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. भिकन कोळी याच्याविरुद्ध कासोदा पोलिस स्टेशनला नऊ, पाचोरा पोलिस स्टेशनला एक आणि जिल्हापेठ जळगाव पोलिस स्टेशनला एक असे एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध कासोदा पोलिस स्टेशनला तिनवेळा प्रतिबंधात्मक कारवाया झालेल्या असून एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. भिकन कोळी याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात तर दिवाकर तायडे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.