पिस्टलचा धाक, वाहनासह चालकाचे अपहरण — एलसीबीच्या तावडीत सुत्रधार झाला नामोहरम

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): पिस्टलचा धाक दाखवत दोघांनी मिळून कुरिअर कंपनीच्या वाहनावरील चालकाचे अपहरण तसेच त्याच्या ताब्यातील मालाने भरलेल्या वाहनाची चोरी केली होती. 2 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या या घटनेतील एका जणाला अटक करण्यात आली होती. मात्र या घटनेतील मुख्य सुत्रधार फरार होता. त्या सुत्रधारास एलसीबी पथकाने अटक केली असून पुढील तपासकामी त्याला चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. या घटनेप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विनोद महारु पाटील हा कुरिअर पार्सल कंपनीच्या वाहनावरील चालक आहे. त्याच्या ताब्यातील बोलेरो वाहनाने तो ग्राहकांच्या विविध किमती वस्तूंच्या पार्सल पाकिटांचा माल कचोलीवाला हाफ सुरत येथे रिकामा करण्यासाठी जात होता. दरम्यान वाटेत आकाश गोरख सोनवणे आणि आकाश विठ्ठल कोळी या दोघांनी त्याला पिस्टलचा धाक दाखवला. पिस्टलचा धाक दाखवत चालक विनोद पाटील याच्या ताब्यातील मालाने भरलेले वाहन दोघांनी आपल्या ताब्यात घेतले होते. चालक विनोद पाटील याचे अपहरण आणि मालाने भरलेल्या वाहनाची चोरी असा गुन्हा दोघांनी केला होता.

13 लाख 97 हजार रुपये किमतीचा माल आणि पाच लाख रुपये किमतीचे वाहन तसेच एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस असा एकुण 18 लाख 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याशिवाय आकाश विठ्ठल कोळी यास अटक करण्यात आली होती. मात्र या घटनेतील मुख्य सुत्रधार आकाश गोरख सोनवणे हा घटना घडल्यापासून व गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते.

आकाश सोनवणे आणि आकाश कोळी हे दोघे जळगाव तालुक्यातील रिधुर येथील रहिवासी आहेत मात्र ते दोघे सुरत येथेच राहतात. चालक विनोद पाटील हा एरंडोल तालुक्यातील मालखेडा येथील मुळ रहिवासी असून तो देखील सुरत येथे कामधंद्यानिमित्त राहतो. तिघे एकमेकांना ओळखत असल्यामुळे दोघा संशयीत आरोपींनी चालकासोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला होता. त्याला दारु पाजून पिस्टलचा धाक दाखवत दोघांनी  वक्ताना सुरत आणि कोळंबा ता. चोपडा या ठिकाणी हा गुन्हा केला.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी करत होते. मुख्य सुत्रधार आकाश गोरख सोनवणे हा जळगाव शहरात आला असल्याची गोपनीय माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, महेश महाजन, किरण चौधरी, दर्शन ढाकणे आदींना पुढील तपास व कारवाईकामी रवाना केले. तपास पथकाने त्याचा माग काढत जळगाव शहरातील सागर पार्क परिसरातून ताब्यात घेत अटक केली. पुढील तपासकामी त्याला चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here