जळगाव : यावल तालुक्याच्या फैजपूर परिसरात सट्टा जुगार सध्या तेजीत सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. फैजपूर परिसरातील तरुण पिढी या सट्टा जुगाराच्या नादी लागल्याचे देखील दिसून येत आहे. साधारण आठ महिन्यापासून फैजपूर पोलिस स्टेशनचा चार्ज घेतलेले सहायक पोलिस निरीक्षक निलेश नानाजी वाघ हे “आपण अजून नवीन आहोत” असेच म्हणत आहेत. “आपण नविन आहोत, आपल्याला अद्याप माहिती नाही” असे म्हणून ते सट्टा जुगार व्यावसायीकांना अर्थपुर्ण अभय तर देत नाही? अशी जनतेच्या मनात शंका निर्माण होत आहे. परिसरात सुरु असलेल्या सट्टा जुगाराबद्दल ते डोळेझाक करत असल्याचे आता उघड उघडपणे देखील म्हटले जात आहेत.
फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील न्हावी या गावी या जुगार अड्ड्याचा मुख्य व्यावसायीक आपली सुत्रे हलवत असल्याचे म्हटले जाते. न्हावी येथील या मुख्य व्यावसायिकाच्या अख्त्यारीत न्हावी सह मारुळ, आमोदा, हिंगोणा अशी जवळपास 28 गावे असल्याचे समजते. बामणोद येथील एक व्यावसायीक देखील हा व्यवसाय ऑपरेट करत असल्याचे म्हटले जाते. बामणोद येथील सट्टापेढी चालवणा-या व्यावसायीकाची ही तिसरी पिढी असल्याचे म्हटले जाते. मुख्य फैजपूर शहरात मुख्य पेढी मालकाच्या हाताखाली जवळपास 15 ते 16 जण काम करत असल्याचे म्हटले जाते. एकंदरीत फैजपूर शहरात या व्यवसायाची व्याप्ती मोठी असून कुणाच्या आशिर्वादाने ही चंगळ सुरु आहे हे जनतेला चांगल्याप्रकारे माहिती आहे. “आपण नवीन आहोत” असे म्हणून सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ मात्र या व्यवसायाकडे कानाडोळा करत असल्याची ओरड होत आहे.
गेल्या आठवड्यात फैजपूर शहराच्या मध्यवर्ती भागात इंगळे आडनावाच्या एका व्यक्तीने पोलिसांच्या परवानगीविना सट्टा जुगाराचा अड्डा सुरु केल्याचे देखील या निमीत्ताने समोर आले. आपल्याला न विचारता आपल्या परवानगी विना इंगळे आडनाव असलेल्या व्यक्तीने हा व्यवसाय सुरु केल्याचे समजताच स.पो.नि. वाघ चिडले. आताच त्याच्यावर रेड करतो असे त्यांनी म्हटले. मात्र रेड करण्याऐवजी आपल्या कर्मचा-यांच्या साथीने त्याला बोलावण्यात आले. तु फुकटात कसा काय व्यवसाय करतो असे म्हणत त्याला खडसावण्यात आले. “मी असाच विना पोलिस परवानगी व्यवसाय करतो” असे त्या इंगळे आडनावाच्या व्यावसायीकाने उत्तर दिल्याचे समजते. बराच वेळ शाब्दिक खडाजंगी झाल्यानंतर यापुढे आमच्या रितसर आशिर्वाद वजा परवानगी शिवाय व्यवसाय करायचा नाही अशी तंबी देत त्याला पिटाळून लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
सट्टा जुगार या व्यवसायाला कायदेशीर परवानगी नसली तरी पोलिसांच्या अर्थपुर्ण आशिर्वाद वजा परवानगीने हा व्यवसाय सुरु असतो अशी भोळी जनता म्हणते. गेल्या आठ दिवसांपुर्वी विना अर्थपुर्ण आशिर्वाद आणि विनापरवानगीने सुरु असलेला व्यवसाय बंद करण्याचा इंगळे यास दम देण्यात आला. असे काही काही विना परवानगी व्यवसाय परस्पर सहमतीने स्थानिक पातळीवर सुरु असल्याची देखील दबक्या आवाजात संबंधीतांमधे चर्चा सुरु आहे. वरिष्ठांना समजू न देता स्थानिक पातळीवरच असे काही व्यवसाय सुरु असल्यास तो महसुल स्थानिक पातळीवरच गडप तर होत नाही अशी देखील चर्चा या निमित्ताने सुरु असल्याचे समजते. विविध अधिका-यांची परवानगी मिळाल्यानंतर तसेच हप्ते वेळच्या वेळी दिल्यानंतर हा व्यवसाय सुरु केला जातो अशी भोळी भाबडी जनता म्हणते. त्यात कितपत तथ्य आहे ते हुशार जनतेला समजते.