जळगाव : संचीत रजा भोगल्यानंतर देखील मुदतीत कारागृहात हजर न होणा-या बंदीवानास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख (रा. मच्छी मार्केट तांबापुरा जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी बंदीवानाचे नाव आहे. गुड्डू यास एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेसह पाचशे रुपये आणि दंड न भरल्यास एक महिना अधिकचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.
गुड्डु उर्फ कानशा वहाब शेख हा मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे शिक्षा भोगत होता. दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी तो 21 दिवसांच्या संचीत रजेवर सुटला होता. दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी त्यांची संचीत रजा संपल्यानंतर देखील तो कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे कारागृह शिपाई महेंद्र मंगल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध 17 डिसेंबर रोजी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड्डू शेख याच्या शोधार्थ एक पथक तयार करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. नितीन पाटील, पो.ना. किशोर पाटील, गणेश शिरसाळे सचिन पाटील, इम्रान बेग, छगन तायडे, ललीत नारखेडे, किरण पाटील साईनाथ मुंढे आदींच्या पथकाने फरार गुड्डू यास तो सुरत येथे रेल्वेने जाण्याच्या प्रयत्नात असतांना ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.