जळगाव दि. २३ (प्रतिनिधी) – जैन हिल्स येथे गेल्या १० डिसेंबर पासून हायटेक शेतीचा नवा हुंकार कृषिमहोत्सव सुरू झाला आहे. एकाच ठिकाणी शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना बघता यावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. त्यास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज गुजरात, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, हिंगोली, सोलापूर, सातारा आदि जिल्ह्यातील १००० शेतकरी सहभागी झाले होते. २३ डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या औचित्याने येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे टिळा लावून गांधी टोपी, उपरणे तर महिला शेतकरीला हळदी-कुंकु लावून त्यांचा स्कार्फ देऊन गौरव करण्यात आला.
२३ डिसेंबर रोजी देशाचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी भारतीय शेतीला सुधारण्यासाठी प्रयत्न केले. तद्वतच जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी देखील शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले. त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून असंख्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपले आयुष्य वेचले. ‘शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केवळ कणाच नव्हे तर देशाच्या संस्कृतिचा घट्ट पाया सुद्ध आहे’ असे विचार भवरलालजी जैन यांचे होते. तोच धागा पकडून श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या जन्मजयंतीच्या औचित्याने हा कृषि महोत्सव खास शेतकऱ्यांसाठी आयोजण्यात आलेला आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.तर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कृषी महोत्सवाची प्रत्यक्ष फिल्ड पाहणीची व्यवस्था १४ जानेवारी २०२४ पर्यंत करण्यात आली आहे. जैन हिल्स येथे केळीच्या सात ते आठ प्रकारची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी ठिबक व बेडवर लागवड, आठ महिन्यात आलेले पिक ग्रॅण्डनैन ही केळीची जात, ३० फूट उंचीची लाल केळीची बाग बघून तर सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. ही कृषी पंढरी बघण्यासाठी शेतकरी रुपी वारकरी जैन हिल्स येथे येत आहेत. ते नवनवीन तंत्रज्ञान समजून घेत आहेत. पाणी-माती परीक्षण करून कोणते पिक घ्यावे, ठिबक सिंचनाचे तंत्र, किती अंतरावर लागवड करावी, फर्टिगेशन कसे करावे इत्यादी सर्व काही येथे तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. याबाबीमुळे शेतकऱ्यांच्या अनुभव व ज्ञानात भर पडत आहे. हळद, आले, टॉमोटो व कांदा सारख्या पिकांमध्ये समृद्धी मार्ग आहे. ह्यासंबंधीत अनेक व्हरायटीची माहिती शेतकरी मोठ्या उत्सुकतेने करून घेत आहेत. कंपनीच्या कांदा निर्जलीकरण प्रकल्पासाठी करार शेती अंतर्गत पांढरा कांदा लावला जातो. त्यासह लाल कांदा यांच्याही विविध व्हरायटी येथे बघायला मिळतात. लसूणची देखील लागवड केली गेली आहे. याशिवाय टमोटो, मिरचीची लागवड वापरलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना बघायला मिळत आहे. फळबागांमध्ये डाळिंब, मोसंबी, जैन स्वीट ऑरेंज, आंबा, लिंबू, पपई यासह अन्य फळपिकांची लागवड पद्धतीमध्ये बदल केला आहे. अति सघन लागवड पद्धतीतून शेतकऱ्यांना कमी जागेत, कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा मार्ग मिळत आहे. सूक्ष्म सिंचनामध्ये ठिबक, तुषार सिंचनासह अन्य पद्धतींसह ज्यांच्याकडे ५० ते १०० किंवा त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रामध्ये जैन ऑटोमेशन पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. यातून सिंचनासह फर्टिगेशन यंत्रणाद्वारे खताचे नियंत्रण ठेवता येते व मजुरीवरील अतिरीक्त खर्च कमी करता येतो. एकाच ठिकाणी हे सर्व तंत्रज्ञान बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.