जळगाव : बांबू विक्रीसाठी वापरात असलेली जागा बळकावण्यासाठी धाकदपटशा वापरुन चाकू हल्ला करत इसमास जखमी करणा-या पाचही जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंभू भोसले, विशाल वाघ, महेश चिंचोलकर, विजय अहिरे उर्फ भोपाली आणि कार्तिक भोसले उर्फ सोनु अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाचही जणांची नावे आहेत.
विनोद राजाराम बाविस्कर हे बांभोरी येथील रहिवासी सिक्युरिटी गार्ड आहेत. ते एमआयडीसी परिसरातील काशिनाथ लॉज चौकानजीक बांबू विक्रीचे काम करतात. त्यांना पाचही जणांनी 23 व 25 डिसेंबर रोजी धमकी देत जागा रिकामी करण्यास बजावले. जागा रिकामी करण्यास विनोद बाविस्कर यांनी नकार दिला असता 26 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाचही जणांनी मिळून त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
विशाल वाघ याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून तो विनोद बाविस्कर यांच्या गळ्यावर चालवला. मात्र तो चाकू त्यांचा मित्र सचिन पाटील याने त्याच्या हातावर घेत त्यांचा बचाव केला. त्यात सचिन पाटील जखमी झाला. या घटनेप्रकरणी पाचही जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार निलेश गोसावी करत आहेत.