जळगाव : जळगावचे सुप्रसिद्ध आणि दानशुर सुवर्ण व्यावसायिक आर.सी. बाफना यांच्या संकल्पनेतून जळगाव बस स्थानकावर निर्माण झालेली पाणपोई अर्थात जलमंदीर सध्या पाणी टंचाईचा सामना करत आहे. या पाणी टंचाईमुळे हजारोच्या संख्येने प्रवासी, वाहक आणि चालक तहानले आहेत.
जळगाव बस स्थानकावरील जलमंदीराला पाणी पुरवठा करण्यासाठी जुनी पाईप लाईन होती. त्या पाईप लाईनच्या माध्यमातून एकवेळा आलेले आणि साठवलेले पाणी साधारण तिन ते चार दिवस पुरत होते. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात बस स्थानकावर भंगाळे गृपच्या माध्यमातून भाडे तत्वावर हॉटेल सुरु झाली. त्यावेळी अजून एक अर्धा इंची पाईप लाईन टाकण्यात आली होती असे समजते. त्या अर्धा इंची पाईपलाईनच्या माध्यमातून एक ते दोन दिवसाआड पाणी येत होते. अशा प्रकारे जलमंदीराला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा सुरु होता. त्यामुळे दिवसभर बस स्थानकात येणा-या आणि प्रवास करुन जाणा-या प्रवाशांची तृष्णा भागवली जात होती.
मात्र आता पुर्वीच्या जुन्या पाईप लाईन जळगाव मनपाने काढून टाकल्याचे समजते. नव्या पाईप लाईनच्या माध्यमातून गांधी बगिचा, झुणका भाकर केंद्र आणि जलमंदीर अशा तिन ठिकाणी पाणीपुरवठा सुरु असल्याचे सांगितले जाते. हा पाणीपुरवठा दोन ते तिन दिवसाआड केवळ अर्धा ते एक तासांसाठी सुरु असतो. ते पाणी हजारो प्रवासी, वाहक आणि चालकांसाठी तोकडे ठरत आहे. जी परिस्थिती जलमंदीराची आहे तीच परिस्थिती गांधी बगिचा आणि झुणका भाकर केंद्राची देखील असल्याचे सांगितले जाते. झुणका भाकर केंद्रात पाण्याची मोटार लावली जात असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे जलमंदीराला कमी प्रमाणात होणारा पाणी पुरवठा अजून कमी प्रमाणात होतो. सद्यस्थितीत जलमंदीराला होणारा पाणी पुरवठा दोन दिवसातून एकवेळा अल्प प्रमाणात होत आहे. अतिशय संथ गतीने जलमंदीराच्या नळाला येणारे पाणी काही वेळातच संपून जाते. याउलट पाणी पिण्यासाठी येणा-या प्रवाशांची संख्या हजारोंच्या संख्येने दररोज सुरु असते. तहानलेले प्रवासी आल्या पावली परत जात आहेत. काही प्रवाशांनी याबाबत आर.सी. बाफना ज्वेलर्स व्यवस्थापनाकडे तक्रार देखील केली. मात्र हवे तसे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे ही समस्या सुटलेली नाही. हा पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.