जळगाव : रईसखा रेल्वेत केळी विक्री करत असे. केळी विक्री करुन तो आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे. पत्नी, चार मुले, व आईसह तो रावेर येथे रहात होता. त्याचे सावदा येथील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. त्याचे त्याच्या पत्नीसोबत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत असत. दरम्यान त्याचे सावदा येथील महिलेसोबात प्रेमप्रकरण सुरु होते.
आपल्या पतीचे सावदा येथील परस्त्रीसोबत सुरु असलेला प्रेमाचा सिलसिला त्याच्या पत्नीला समजला होता. त्यामुळे पती पत्नीच्या वादात अजुनच भर पडत होती. पत्नीला पर्याय म्हणून रईसखा जवळ प्रेयसी होती. त्यामुळे एके दिवशी पत्नी व मुलांना सोडून तो सावदा येथे त्याच्या प्रेयसीकडे राहण्यास आला. त्याचे प्रेयसीसोबत मन रमले. त्याचा स्वभाव खुशालचेंडू असल्यामुळे चार वर्ष उलटले तरी तो सावदा येथे प्रेयसीसोबतच रहात होता.
रईसखा काही प्रमाणात गुन्हेगारी वृत्तीचा देखील होता. त्याच्या नावे मध्यप्रदेशातील बुरहानपूरच्या लालबाग पोलिस स्टेशनला काही गुन्हे दाखल असल्याचे समजते. केळी विकून आलेल्या पैशात तो प्रेयसीचे लाड पुर्ण करत होता. अशा प्रकारे त्याचे जीवनमान सुरु होते.
धावत्या रेल्वेत व्यवसाय करणा-या व्यावसायीकांचा संबध गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांशी कमी अधिक प्रमाणात येतच असतो. धावत्या रेल्वेत केळी विक्री करणा-या रईसखा याचा संबंध अजहरखान अयुबखान, शराजुशहा दाउदशहा आणि शाहरुखखान कलीमखान यांच्यासोबत येत असे. त्याचे कारण म्हणजे हे तिघे गुन्हेगारी वृत्तीचे मित्र सावदा येथेच रहात होते. रईसखा देखील सावदा येथे प्रेयसीसोबत रहात होता.
हे तिघे मित्र देखील रेल्वेशी संबंधीत होते. रईसखा धावत्या रेल्वेत केळी विकत असे तर हे तिघे मित्र धावत्या रेल्वेत चो-या करत असत. केळी विक्रेता रईसखा आपले चोरीचे धंदे पोलिसांना सांगत असल्याचा तिघा मित्रांना नेहमी संशय येत असे. काही दिवसांपुर्वी भुसावळ रेल्वे पोलिसांनी या तिघांना एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती.
आपल्याबद्दल रईसखा हाच रेल्वे पोलीसांना माहिती देत असल्याचा त्यांना संशय येत होता त्या संशयातून त्यांचा रईसखावर राग होता. रईसखा हा देखील काही धुतल्या तांदळाचा नव्हता. त्याच्यावर देखील मध्यप्रदेशातील बुरहानपुर येथील लालबाग पोलिस स्टेशला काही गुन्हे दाखल असल्याचे सांगीतले जाते.
या संशयातून तिघा जणांनी दहा ते बारा वेळा रईसखा सोबत वाद घातला होता. तिघांनी आपल्यासोबत संशयातून वाद घातला असल्याचे त्याने त्याचा रावेर येथील भाऊ शरीफ खा दिलदार खा यास सांगितले होते. या वादामुळे रईसखा वैतागला होता. आपल्या जिवीताला या तिघांकडून धोका असल्याचे रईसला वाटत होते.
गेल्या वर्षी शाहरुख खान कलीम खान याचा रईससोबत वाद झाला होता. या वादात शाहरुख याने रईस याच्या डोक्यात लोखंडी आसारी मारुन त्याला जखमी केले होते. या घटनेची सावदा पोलिस स्टेशनला नोंद घेण्यात आली होती.
20 ऑगस्ट रोजी पुर्ववैमनस्यातून तिघा जणांनी एकत्र येत रईसखा याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. या दिवशी सायंकाळी पाच वाजता रईस सावदा शहरातील मरिमाता मंदिर परिसराच्या मागील बाजूस उभा होता. त्यावेळी टपून बसलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्लाबोल केला. तिघांच्या हातात लोखंडी पाईप होते. त्या पाईपांनी त्यांनी बेसावध रईसखा याच्यावर जोरदार हल्ला केला.
या हल्ल्यात रईसखा जवळच असलेल्या चिखलात पडला. त्याच्या डोक्यातून रक्त निघाले. ते रक्त वाहू लागल्याने रईसखा जागीच ठार झाला. रईस खा जिवानिशी गेल्याचे समजताच तिघा हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच हल्लकल्लोळ माजला. परिसरात दहशत माजली. या घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिस स्टेशनचे स.पो,नि.राहुल वाघ आपले सहकारी पोलिस उप निरिक्षक राजेंद्र पवार, रविंद्र मोरे, संजय चौधरी व इतर कर्मचारी वर्गासह घटनास्थळी दाखल झाले.
मयत रईस खा याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आला. मयत रईसखा ज्या महिलेसोबत रहात होता ती महिला घटनेच्या वेळी तेथे हजर होती. तिने हा घटनाक्रम पाहिलेला होता. काही वेळाने मयत रईस खा याचा रावेर येथील भाऊ शरीफ खा दिलदार खा तेथे हजर झाला. त्याला त्या महिलेकडून सर्व प्रकार समजला.
शरीफ खा दिलदार खा याच्या फिर्यादीनुसार सावदा पोलिस स्टेशनला फरार झालेल्या तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.33/20 भा.द.वि.302, 34, 120(ब) नुसार दाखल करण्यात आला. सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक राहुल वाघ यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.
घटनेनंतर काही तासातच फरार झालेल्या अजहरखान अयुबखान, राजुशहा दाउदशहा, शहारुख खान कलीमखान या तिघांना अटक करण्यात यश मिळवले. तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. राहुल वाघ व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक राजेंद्र पवार, पोलिस नाईक देवा पाटील, बाळू मराठे, रविंद्र मोरे, संजय चौधरी आदी करत आहेत.