रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या चाकूहल्ल्यात तरुण जखमी

जळगाव : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने एका तरुणावर चाकूहल्ला तर दुस-याने चापटाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. जखमी तरुणाने दिलेल्या जवाबाच्या आधारे एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ निंबा वंजारी (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असे जखमी तरुणाचे तर दादू उर्फ दिक्षांत देविदास सपकाळे असे चाकू हल्ला करणा-या तरुणाचे नाव आहे.   

सोमनाथ निंबा वंजारी हा तरुण 31 डिसेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असतांना त्याचे लक्ष दादू याच्याकडे गेले. माझ्याकडे काय बघतो असे म्हणत दादूने सोमनाथ यास चापटाबुक्यांनी मारहाण केली. दादूच्या मारहाणीला घाबरुन सोमनाथ याने तेथून पळ काढला. मेहरुण तलावाच्या दिशेने सोमनाथ घरी परत जात असतांना वाटेत दादू व त्याचा साथीदार अशा दोघांनी सोमनाथची वाट अडवली.

दादूच्या सोबत असलेल्या तरुणाने सोमनाथ यास मारहाण केली. तसेच दादूने सोमनाथच्या पोटाखाली तसेच कमरेजवळ चाकू हल्ला करुन त्यास जखमी केले. आमच्या नादी लागायचे नाही नाहीतर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत दोघे हल्लेखोर तेथून निघून गेले. जमलेल्या लोकांच्या मदतीने जखमी सोमनाथ घरी व तेथून दवाखान्यात दाखल झाला.  खासगी रुग्णालयात जखमी सोमनाथ याने दिलेल्या जवाबाच्या आधारे एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने दादू यास अटकेनंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील दादू उर्फ दिक्षांत सपकाळे याच्याविरुद्ध यापुर्वी चार गुन्हे दाखल आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here