जळगाव : ट्रकमधूनपडलेल्या कांद्याच्या गोण्या उचलण्याच्या कारणावरुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सुमारे दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडी दांडक्याने करण्यात आलेल्या मारहाणीच्या या घटनेत एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
31 डिसेंबर रोजी सायंकाळी कांद्याच्याट्रकमधून काही गोण्या खाली पडल्या. त्या गोण्या नाना बाबुराव बागडे (रा. चोरटक्की ता. एरंडोल) या इसमाने उचलल्या. या कारणावरुन विखरण गावातील सागर चौधरी, तुका महाजन, समाधान माळी, भुषण महाजन, कैलास महाजन, योगेश महाजन, लोटन चौधरी व अनोळखी तिन ते चार जण नाना बागडे याच्या घरी आले.
नाना बागडे याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने होणारा प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्याने डावा हात पुढे केला. या हल्ल्यात नाना बागडे याचा डावा हात निखळल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी नाना बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना अटक करण्यात आली आहे. उप विभागीय अधिकारी सुनिल नंदवाळकर पुढील तपास करत आहेत.