जळगाव : मद्य घेण्यासाठी आलेल्या रिक्षातील तिघांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश प्रकाश तायडे असे जखमी तरुणाचे नाव आहे.
समता नगर येथील रहिवासी आकाश प्रकाश तायडे हा तरुण बिअर घेण्यासाठी रामानंद नगर पाण्याच्या टाकीजवळ प्रितम वाईन शॉप या दुकानावर 31 डिसेंबरच्या रात्री साडे अकरा वाजता आला होता. आकाश तायडे तेथून परत जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी रिक्षाने तिन अनोळखी तरुण देखील मद्य विकत घेण्यासाठी त्याच दुकानावर आले. वाईन शॉप सुरु आहे का अशी आलेल्या तिघा अनोळखी इसमांनी आकाशला विचारणा केली. त्यावर दुकान बंद आहे असे उत्तर त्याने तिघांना दिले.
यावेळी आलेल्या तिघा अज्ञातांनी आकाशला चापटा बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ सुरु केली. कोणत्यातरी लोखंडी धारदार वस्तूने आकाशच्या डाव्या हाताच्या कोपरावर, मानेवर, कपाळावर आणि डोक्यावर वार केले. त्यातआकाश जखमी झाला. याशिवाय हातातील काचेची बाटली देखील आकाशच्या डोक्यावर फोडण्यात आली. जखमी आकाश तायडे याने या घटनेप्रकरणी तिघा अज्ञातांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हे.कॉ. प्रविण जगदाळे करत आहे.