जळगावचे माजी जिल्हाधिकारी अमन मित्तल मुंबई कडील त्यांच्या खासगी वर्तनासह त्यांच्याविरुद्ध मारहाणीची कथित एफआयआर दाखल झाल्याने चर्चेत आले आहेत. खरे तर त्यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग आणि गुन्हा दाखल होणे हा त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा भाग आहे. ते जळगावला जिल्हाधिकारी म्हणून उच्चपदस्थ अधिकारी होते. उच्चपदस्थ अधिकारी हा देखील माणूसच. त्यालाही राग, लोभ, मत्सर येऊ शकतो. स्पर्धा – हेवादावा, प्रसिद्धी, चमकोगिरीची ओढ हा मनुष्यस्वभाव.
जळगाव – धुळ्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी राहिलेले अनेक जण त्यांच्या अंगभूत कर्तव्य, सवयी, कमजोरी, प्रशासकीय निर्णय, हिरोगिरी अशा वैशिष्टय़ांनी काही काळ लोकचर्चेत राहिले. राज्याच्या प्रशासन सेवेतील जिल्हाधिकारी पदापर्यंतचे बडे उच्चपदस्थ अधिकारी सत्तेच्या खुर्चीत शासना नियुक्तीने स्थानापन्न होताच त्यांना स्थानपरत्वे सन्मानासह उच्च अधिकार प्राप्त होतातच. जनताही त्यांचा यथोचित सन्मान राखते. तथापि मित्तल साहेब येथून बदली झाल्यानंतर घणसोली मुंबई भागात त्यांच्या खासगी वर्तनामुळे चर्चेत आले. त्यांनी म्हणे एका नागरिकास मारहाण केल्याची पोलिसात तक्रार झाली. गुन्ह्याचीही नोंद झाला. त्यात काही काही नवल नाही.
जळगावात काही वर्षांपूर्वी मार्केटमध्ये भाजी खरेदीस आलेल्या न्यायदान क्षेत्रातील सन्माननीय अधिका-याचा एका भाजी विक्रेत्या महिलेशी वाद झाला. त्या नंतर हे प्रकरण मुद्यावरून गुद्यावर आले. अधिका-याने अधिकाराचा वापर करून तेथे पोलीस प्रशासकीय यंत्रणा आणली. लगेच भाजी विक्रेती महिला नरमली. हे असे मोठे साहेब असल्याचे माहित नव्हते. कळले असते तर पैसेही घेतले नसते. क्षमा करा आता असे म्हणत भाजीपाला विक्रेती महिलेने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
खाकी वर्दीमुळे पोलिस खात्याचा सर्वत्र सन्मान केला जातो. मात्र महसूल प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना ड्रेसकोड नसतो. कार्यालयीन कर्तव्यानंतर खासगी जीवनात सर्वसामान्य जनतेप्रमाणे त्यांनाही वापरण्याचे स्वातंत्र्य आहेच. आणखी काही वर्षांपूर्वी पारोळ्यालगत एका ढाब्यावर भोजनास आलेल्यांचा वाद असाच गाजला. पोलिसांना पाचारण केल्यावर त्यांनी त्या सर्वांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेले. परंतु ज्यांना आपण कथित शांतता भंगाच्या आरोपावरून पोलिस स्टेशनला आणले ती मंडळी खरच उच्चपदस्थ असली तर आपलीच पंचाईत होऊ शकते असे वकील मित्राच्या सल्ल्यावरुन लक्षात येताच फौजदार महाशयांनी त्या सर्वांना ॲम्बेसेडरमधूनच जळगावला आणून न्यायदान क्षेत्रातील महनियांना वर्दी दिली. शंका खरी निघाली. त्या सर्वांना आतिथ्यपुर्वक सन्मानाने पाठवण्यात आले. तत्पूर्वी माफीनामा नाट्य रंगले हे वेगळे सांगणे नकोच.
आता राहिले मित्तल साहेबांचे. त्यांनी जळगावच्या खान्देश मिल जागेच्या वादग्रस्त जागेवरील कथित भूखंड, बांधकामोत्तर दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकानांच्या खरेदी विक्रीचे दस्त नोंदवण्यास बंदी घालणारा आदेश मुद्रांक विभागास दिला होता. खान्देश मिलचा विषय विविध राज्यात गाजलेला. वादग्रस्त जागा. कोर्ट मॅटर गाजले. त्या वादग्रस्त जागेवरील दस्त नोंदणीस मज्जाव करणारा दिलेला आदेश 15 ते 20 दिवसात याच साहेबांनी मागे घेतला. खरे तर त्यांनी आधी दिलेला आदेशच योग्य होता असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण जागेचा मालक शासन असेल तर भाडेकरु किंवा कब्जेदार ती कशी विकू शकतो? (All sale deeds illegal). आता अशा वेळी मित्तल यांनी खान्देश मिल भूखंड खरेदी विक्री, दुकानांचे खरेदी विक्री नोंदणीस मुद्रांक विभागाला बंदी घालणारा आदेश नवे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कायम राखतील काय? यावर चर्चा व्हायला हवी. नव्या जिल्हाधिकाऱ्यांकडून हे काम करवून घ्यायला हवे. तसे करायचे सोडून एखाद्या अधिका-याच्या खासगी वर्तनावर चर्चा आयोग्य वाटते.
राज्य शासन महसूल प्रशासनातील अनेक बडे अधिकारी, काही विशिष्ट उद्योगसमूह, उद्योगपती, भांडवलदार यांच्या हिताचे निर्णय करतात. त्यातही काही अटी शिथील करतात. त्याची पडताळणी करण्याची यंत्रणा दिसत नाही. काही कथित लोकप्रतिनिधी लॉबिंग करतात. त्यासाठी अधिका-यांवर वशीकरण प्रयोग किंवा त्याची कमजोरी शोधली जाते. धुळ्याचे एक जिल्हाधिकारी कवी मनाचे होते. हे साहेब कविता करतात असे एकाने शोधून काढले. लागलीच मंडळी कामाला लागली. सायंकाळी आठ वाजता अनेक ठिकाणी साहेबांच्या स्वरचित कविता वाचन कार्यक्रमांचा पूर वाहिला. साहेब खुश झाले. अनेकांची तुंबलेली प्रकरणे मार्गी लागली. एखाद्याची दुखरी नस पकडणे, कमजोरी शोधणे किंवा वशीकरण – “साम – दाम” प्रयोगाने कार्यसिद्धी होतेच होते. त्याची वरील मोजकी उदाहरणे जनतेच्या ज्ञानात भर घालो एवढीच सदिच्छा.