आ. सुरेश भोळे यांच्या वापरातील वाहनावर दंडात्मक कारवाई

जळगाव : आ. सुरेश भोळे वापरत असलेल्या चारचाकी वाहनावर जळगाव शहर वाहतुक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतुक शाखेतर्फे ई चलनच्या माध्यमातून आकारण्यात आलेली पाचशे रुपयांची दंडात्मक रक्कम अनपेड आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी याबाबत वाहतूक शाखेकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. सामान्य वाहन चालकांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई होत असतांना आमदार वापरत असलेल्या वाहनावर कारवाई का नाही? अशी जनमानसात ओरड सुरु होती. आ. भोळे यांच्यासाठी पाचशे रुपये ही रक्कम किरकोळ असली तरी अद्याप अनपेड दिसत आहे. या कारवाईच्या माध्यमातून जनमानसात कायदा सर्वांना समान हा संदेश गेला आहे.

आ.सुरेश भोळे वापरत असलेले एमएच 19 डीव्ही 1 हे वाहन त्यांच्या सुविद्य पत्नी सीमा सुरेश भोळे यांच्या नावावर आहे. फॅन्सी नंबर प्लेट साठी कारवाई करण्यात आलेले हे वाहन आ. सुरेश भोळे वापरत आहेत. या वाहनावर अशोक स्तंभाचे स्टीकर अद्याप कायम आहे. अशोक स्तंभाचे चिन्ह असलेले स्टीकर वापरण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, लोकसभा स्पिकर, राज्यसभा स्पिकर आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधिश अशा गणमान्य व्यक्तींनाच वापरण्याचा अधिकार आहे.

मात्र आ.भोळे हे त्यांच्या वाहनांवर अद्यापही अशोक स्तंभाचे स्टिकर सर्रासपणे वापरत असल्याचे दिसून येत आहे. जळगावचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे कार्यरत असतांना त्यांना या स्टिकरचा वापर बंद करण्याबाबत समज दिली होती असे समजते. मात्र त्यानंतर देखील त्यांनी या स्टिकरचा वापर कायम ठेवला आहे.  ज्याप्रमाणे ते वापरत असलेल्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेटबाबत कारवाई झाली त्याचप्रमाणे त्यांच्या वाहनांवरील अशोक स्तंभाच्या वापराबाबत कारवाई होते का? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here