फोनवर गमतीने म्हटले साला, संशयकल्लोळ झाला — बेदम मारहाणीत धनराज मात्र जीवानिशी ठार झाला

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : साधारण 108 वर्षांपुर्वी “संशयकल्लोळ” नावाचे एक नाटक फार गाजले होते. सन 1916 मधे या मुळ नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. गोविंद बल्लाळ देवल हे या नाटकाचे लेखक होते. मराठी संगीत नाटकांच्या युगात “संशयकल्लोळ” हे नाटक त्याकाळी फार लोकप्रिय झाले. अर्धवट माहितीवर विश्वास ठेवून काहीतरी संशय घ्यायचा आणि तो संशय खरा धरुन त्याच्यावर पुढील मनसुबे रचायचे. मग त्यातून संशयात अजून भर आणि त्यातून गोंधळ असा प्रकार या नाटकात दाखवण्यात आला होता. या प्रकाराला आपण संशयकल्लोळ म्हणतो.

केवळ ऐकीव माहितीवर संशय धरुन झालेल्या जबर मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील रिधुरी या गावी घडली. जे कानांनी ऐकलेले असते ते खरेच असते असे नाही. एखाद्यावर आरोप करण्यापुर्वी त्या घटनेची सत्यता पडताळून बघणे गरजेचे असते.

यावल तालुक्याच्या रिधुरी या गावी धनराज वासुदेव पाटील (सोनवणे) हा चाळीशीतील शेतकरी रहात होता. शेती, गुरे-ढोरे, गुराढोरांचा गोठा, शेणखत, दुध-दुभते, शेणाने सारवलेले अंगण या वैभवाच्या बळावर या तरुण शेतक-याचा प्रपंच सुरु होता. अस्सल ग्रामीण शेतक-याच्या घरादारात दिसून येणारा शेतीच्या साधनांसह गुराढोरांचा प्रपंच धनराज पाटील याच्याकडे दिसून येत होता. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील या सर्वांचा धनी असलेला धनराज आपला संसार सुखाने करत होता. बोलून चालून मोकळा असलेला धनराज आपले जीवन आनंदाने व्यतीत करत असतांना का कुणास ठाऊक त्याच्या संसाराला नियतीची नजर लागली. भाऊबंदकीचा वाद त्याच्या जीवावर उठला. भाऊबंदकीचा वाद आणि कलहाने त्याच्या जीवनात एक क्षण असा आला की त्याला थेट जीवालाच मुकावे लागले. भाऊबंदकी जीवावर उठली म्हणजे कशा प्रकारे होत्याचे नव्हते होते ते या घटनेतून दिसून आले.

धनराज सोनवणे रहात असलेल्या घरासमोर त्याच्या गुरांचा गोठा आहे. त्या ठिकाणी तो आपली गुरे बांधत होता. त्या गोठ्याला लागूनच त्याचा चुलत भाऊ सतिष सुखदेव सोनवणे याचा देखील गुरांचा गोठा आहे. धनराज आणि सतिष हे दोघे चुलत भाऊ शेजारी शेजारी रहात होते. दोघांच्या गुरांचा गोठा देखील शेजारी शेजारी आहे. साधारण सहा महिन्यांपुर्वी दोघा भावांमधे जागेच्या कारणावरुन वाद झाले होते. हा वाद थेट फैजपूर पोलिस स्टेशनपर्यंत गेला होता. धनराजची पत्नी सोनी हिने फैजपूर पोलिस स्टेशनला शेजारी राहणा-या सतिष सोनवणे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून दोघा परिवारामधे धुसफुस सुरु होती.

15 जानेवारी 2024 रोजी सर्वत्र मकर संक्रांती या सणाची धामधुम सुरु होती. “तिळगुळ घ्या आणी गोड बोला” असे म्हणत घरोघरी उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. ग्रामीण भागात हा सण आवर्जून साजरा केला जातो. मात्र या दिवशी धनराज सोनवणे यांच्या बाबतीत मात्र अघटीत झाले.

या दिवशी सायंकाळी धनराज सोनवणे हा युवा शेतकरी त्याची पत्नी व दोघा मुलांसह गोठ्यात गुरांना चारापाणी घालत होता. त्यावेळी बाजुच्या गोठ्यात त्याचा चुलत भाऊ सतिष सोनवणे याची पत्नी आरती सोनवणे ही देखील हजर होती. त्यावेळी धनराज हा उमेश नावाच्या जेसीबी चालकासोबत बोलत होता. धनराज आणि उमेश या दोघांची एकमेकांसोबत घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे इकडून धनराज पलीकडच्या उमेश सोबत मोबाईलवर मनमोकळेपणे बोलत होता. दोघांमधे मोठ्या प्रमाणात चेष्टा मश्करी सुरु होती. इकडून धनराज त्याला मोबाईलवर बोलतांना “साल्या” या शब्दाचा वापर करत होता. खानदेशात मित्राला देखील गमतीने बोलतांना “साल्या” असे म्हणतात. त्यामुळे मोबाईलवर उमेश सोबत बोलतांना धनराज त्याला गमतीने “साल्या” असे म्हणत होता. “साल्या” हा शब्द त्याच्याकडून दोन तिन वेळा म्हटला गेला. त्यावेळी शेजारच्या गोठ्यात त्याचा चुलत भाऊ सतिष याची पत्नी आरती ही हजर होती.

मोबाईलवर साल्या हा शब्द धनराज आपल्या पतीला उद्देशून म्हणत असल्याचा गैरसमज आरती सोनवणे हिचा झाला. अगोदरच दोघा परिवारांमधे जागेच्या वादावरुन धुसफुस सुरु होती. त्यातच काही महिन्यांपुर्वी हा वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेला होता. त्यामुळे तीच्या रागाचा पारा चढला. “साल्या” हा शब्द तुम्ही माझ्या पतीला उद्देशून म्हणत असल्याचा तिने धनराज वर थेट आरोप करत शिवीगाळ सुरु केली. त्यावेळी धनराजची पत्नी सोनी हिने आरतीला समजावून सांगितले की उमेश नावाच्या जेसीबी मशिन चालकासोबत माझा पती बोलत होता. दोघांमधे मोबाईलवर थट्टा मश्करी सुरु होती. 

दोन महिलांमधे सुरु असलेल्या वादात आरतीचा पती सतिष सोनवणे याची एंट्री झाली. “साल्या” हा शब्द आपल्यालाच उद्देशून मोबाईलवर म्हटल्याचा त्याचा देखील गैरसमज झाला. मागचा पुढचा विचार न करता सतिष याने हातात लोखंडी पाईप आणला. तो लोखंडी पाईप त्याने सरळ धनराजच्या डोक्यात हाणला. लोखंडी पाईपाचा अचानक  हल्ला झाल्याने धनराज थेट शेणखतात बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. त्याचवेळी सतिषचा भाऊ युवराज सुकदेव सोनवणे, युवराजचा मुलगा दिपक युवराज सोनवणे, मिना युवराज सोनवणे, यमुनाबाई सुकदेव सोनवणे असे सर्वजण त्याच्या दिशेने चाल करुन आले.  

त्यावेळी युवराज सोनवणे व दिपक सोनवणे या दोघांच्या हातात लाकडी काठया होत्या. बेशुद्ध आणि रक्तबंबाळ झालेल्या धनराजला त्याची पत्नी सोनी व दोन्ही मुले उचलण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. मात्र तिघांच्या मानसिक वेदनेकडे कुणीही लक्ष दिले नाही. युवराज सोनवणे व दिपक सोनवणे यांनी बेशुद्ध धनराजची पत्नी सोनी हिला देखील लाकडी काठयांनी मारहाण करु लागले. एवढे कमी झाले की काय म्हणून मिना, आरती, यमुनाबाई या तिघीजणी तिला चापटा बुक्यांनी मारहाण करत होते. धनराजची मुलगी वैष्णवी व मुलगा ओम या दोघांना देखील त्यांनी लाकडी काठयांनी, चापटाबुक्यांनी मारहाण सुरु केली.

आपला मुलगा धनराज हा बेशुद्ध होऊन पडल्याचे बघून त्याचे वडील वासुदेव झावरु सोनवणे यांच्यासह विलास लौटू सोनवणे, भगवान सोनवणे, तुळशिराम शिवलाल सोनवणे तसेच गावातील इतर लोक घटनास्थळी जमा झाले. जमलेल्या लोकांनी धनराजसह त्याची पत्नी व मुलांची जमावाच्या तावडीतून कशिबशी सुटका केली. बेशुद्ध धनराज याला तातडीने रिक्षाने फैजपूर येथील डॉ. खाचणे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. डॉ. खाचणे यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. त्यामुळे मयत धनराज यास यावल ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकामी दाखल करण्यात आले. 

या घटनेप्रकरणी मयत धनराज सोनवणे याची पत्नी सोनी सोनवणे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिस स्टेशनला एकुण सहा जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.न. 9/2024 भा.द.वि. 302, 324, 323, 143, 147, 148, 149, 504 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. सतिष सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे, दिपक युवराज सोनवणे, आरती सतिष सोनवणे, मिना युवराज सोनवणे, यमुनाबाई सुकदेव सोनवणे (सर्व रा. रिधुरी ता. यावल) अशा सहा जणांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला. यापैकी सुरुवातीला सतिष सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे आणि दिपक युवराज सोनवणे या तिघांना अटक करण्यात आली. पोलिस उप निरीक्षक मैनुद्दीन सैय्यद यांनी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here