क्रिकेटच्या खेळातील पराजयाचे शल्य बोचले मनाला–पराजीतांच्या हल्ल्यात विजयी शुभम मुकला जिवाला

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): क्रिकेट हा तरुणांचा आवडता खेळ समजला जातो. गल्लीत अथवा गावोगावी मैदानावर क्रिकेट खेळतांना क्रिकेटच्या जय पराजयातून दोन गटात कधी कधी कमी अधिक प्रमाणात वाद होत असतात. मात्र क्रिकेटच्या खेळात होणा-या जय पराजयातून काही ठिकाणी खूनाच्या देखील घटना घडतात. खेळ म्हटला म्हणजे कोणत्या तरी टीमचा जय आणि कोणत्या तरी टीमचा पराजय हा ठरलेला असतो. मात्र जय पराजयाच्या या लढाईत पराजय झाल्याचे शल्य पराजीत टीममधील तरुणांना कधी कधी स्वस्थ बसू देत नाही. विजयी टीमचा जल्लोष पराजीत टीममधील तरुणांना आपल्याला खून्नस दिल्यासारखा वाटतो. त्यातून कधी कधी खूनासारखी अप्रिय घटना घडते. मात्र प्राणघातक हल्ल्यातून जेव्हा खूनासारखी घटना घडते त्यावेळी एखाद्याचा जीव जातो. या घटनेतून जीव गमावलेल्या तरुणाच्या परिवाराचा आधारवड कोसळत असतो. मरण पावणारा तरुण कुणाचा तरी मुलगा अथवा पती असतो. त्याच्या जाण्याने त्याच्या परिवारावर दुखा:चा डोंगर कोसळतो याची कल्पना हल्ला करणा-या तरुणांना घटनेच्या वेळी येत नाही. या घटनेमुळे हल्लेखोर कमावते अथवा नोकरी, व्यवसायाच्या वाटेवरील तरुण जेलमधे जातात. त्यांच्यादेखील परिवारावर दुखा:चा डोंगर कोसळतो. जेलमधे जाणा-या तरुणांची लग्नकार्य जुळण्यास अडचणी येतात. मात्र तारुण्याच्या जोशात कृत्य घडून जाते आणि त्याचे परिणाम जीवनभर भोगावे लागतात. अशा घटना यापुर्वी कोल्हापूर जिल्ह्यात देखील घडल्या आहेत. जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथे देखील क्रिकेटच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका पोलिस कर्मचा-याचा खून झाला.

शुभम अनिल अगोणे हा चाळीसगाव येथील तरुण मुंबई पोलिस दलात कार्यरत होता. तो आपल्या मुळ गावी चाळीसगाव येथे काही दिवसांसाठी सुटीवर आला होता. सुटीवर आलेल्या शुभमला क्रिकेट खेळण्याची आवड होती. चाळीसगाव शहरात साहजीकच त्याचा मित्रपरिवार होता. क्रिकेटची आवड असलेल्या शुभमच्या मित्र-परिवाराची मित्रा एंटरप्रायजेस क्रिकेट टीम या नावाने टीम होती. या टीममधे शुभम अनिल अगोणे याच्यासोबत अक्षय अगोणे, शुभम तुकाराम बोराडे, विनोद, वैभव, सुमित, राहुल व इतर मित्रांचा समावेश होता. यासोबतच एस.के. गृप टीम या नावाने दुसरी टीम देखील कार्यरत होती. सौरभ कोळी, सिद्धांत कोळी, वसंत बच्छाव असे तरुण  या एस.के. गृप टीममधे सहभागी होते. 14 जानेवारी रोजी चाळीसगाव शहराच्या भडगांव रोडवरील जलाराम मार्बलनजीक मैदानावर क्रिकेटचा सामना आयोजीत करण्यात आला होता. या क्रिकेट सामन्यात शुभम हा देखील मित्रा एंटरप्रायजेस टीमकडून सहभागी झाला होता.

शुभम आणि त्याचा मित्रपरिवार 14 जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आलेल्या क्रिकेट टुर्नामेंटमधे सेमी फायनलमधे खेळण्यासाठी गेला होता. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शुभमचा सहभाग असलेल्या मित्रा एंटरप्राईज क्रिकेट टिमची एस. के. गृप या टिमसोबत सेमी फायनल मॅच झाली. या सेमी फायनलमधे शुभमचा सहभाग असलेला मित्रा एंटरप्रायजेसचा संघ जिंकला. विरुद्ध टीम एस.के. गृपचा पराभव झाला. या पराभवाचे शल्य एस.के. गृपमधील खेळाडूंना बोचू लागले. त्यामुळे या पराभूत टीममधील सौरभ कोळी, सिध्दांत कोळी, वसंत बच्छाव व इतर खेळाडूंनी शुभम व त्याच्यासोबतच्या खेळाडूंसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. बघता बघता एस.के. गृप या टिमचे खेळाडू मित्रा एंटरप्रायजेस या टीममधील खेळांडूना शिवीगाळ करु लागले. 

दरम्यान एस.के. गृपमधील खेळाडू वसंत बच्छाव याने चाकू काढून शुभमसह त्याच्या साथीदार खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी दिली. शुभमने सावधगिरी बाळगत सर्वांना बाजूला नेत समजूतदारीने घेण्याचा सल्ला दिला. खेळ  म्हटला म्हणजे जय पराजय हा होतच असतो असे म्हणत विरुद्ध टीममधील हिंसक वृत्तीच्या खेळाडूंना समजावण्याचा प्रयत्न केला. सौरभ कोळी, सिद्धांत कोळी यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशनला मारामारीचे गुन्हे दाखल असल्याचे माहिती असल्यामुळे शुभम व त्याच्या मित्रांनी नमते घेत  कसाबसा वाद मिटवत घरी जाण्यात धन्यता मानली.

दुपारी चार  वाजेच्या सुमारास फायनल मॅच  खेळण्यासाठी पुन्हा दोन्ही टीमचे खेळाडू मैदानावर आले. फायनल मॅचमधे देखील मित्रा एंटरप्रायजेस या टीमचाच विजय झाला. फायनल मॅच जिंकल्यामुळे बक्षीस घेऊन विजयाचा जल्लोष करत  शुभम व त्याचे विजयी साथीदार खेळाडू घराकडे निघाले. हा प्रकार पराजीत खेळाडूंना बघवला गेला नाही. विजयी खेळाडू घराकडे जात असतांना वाटेत घाटरोडवर सौरभ कोळी, सिध्दांत कोळी, अण्णा कोळी, वसंत बच्छाव, पृथ्वी कुमावत व इतरांनी शुभमसह त्याच्या मित्रांकडे खुनशी नजरेने बघून त्यांच्या दिशेने दगडफेक सुरु केली.

परिस्थिती बिघडत असल्याचे बघून शुभम आणि त्याच्यासोबतचे इतर सर्व विजयी खेळाडूंनी तेथून जीव  वाचवण्यासाठी तेथून पलायन केले. पाटणादेवी रस्त्यावरील पीर मुसा कादरीबाबा दर्ग्याच्या बाहेर असलेल्या बाकावर सर्वजण कसेबसे आले. तेथील बाकावर बसून सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. मात्र त्यांचा जीवघेणा संघर्ष अजून थांबला नव्हता.

शुभम अगोणे, सचिन बोराडे, राहुल अगोणे, भुषण अगोणे, अक्षय अगोणे, शुभम बोराडे, आकाश आवारे व इतर सर्व मित्र एकत्रीत थांबले असतांना त्यांच्या मागावर असलेले हल्लेखोर त्याठिकाणी आले. आहिल्यादेवी चौकाकडून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रिक्षा आणि मोटार सायकलने सौरभ अण्णा कोळी, सिध्दांत अण्णा कोळी, वसंत राजु बच्छाव, अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी, पृथ्वी कुमावत, चित्रा कैलास मोरे, जय मोरे व इतर हल्लेखोर शुभम आणि त्याच्या सोबत असलेल्या मित्रांच्या दिशेने आले. आलेल्या वाहनातून खाली उतरताच सर्वजण शुभमसह त्याच्यासोबत असलेल्या सर्वांच्या दिशेने झेपावले. सौरभ कोळी याच्या हातात तलवार, वसंत बच्छाव याच्या हातात चॉपर, सिध्दांत कोळी याच्या हातात क्रिकेट बॅट होती. पृथ्वी कुमावत आणि त्याच्यासोबत असलेल्या इतरांच्या हातात क्रिकेटचे स्टंप होते.

अण्णा कोळी व चित्रा मोरे या दोघांनी शुभमसह त्याच्या सोबत असलेल्या सर्वांकडे बोट दाखवत यांना मारा, यांच्या अंगात खुप मस्ती आली आहे असे  म्हणत चिथावणी दिली. सौरभ कोळी याने शुभमचे चुलत काका आनंद अगोणे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. तो हल्ला आनंद अगोणे यांनी उजव्या हाताने अडवला. त्यामुळे त्यांच्या बोटासह अंगठ्याला मार लागला. काही समजण्याच्या आत  सिद्धांत कोळी याने आनंद अगोणे यांच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. याचवेळी वसंत बच्छाव याने त्याच्या हातातील चॉपरने शुभमवर जोरदार हल्ला केला. चॉपरच्या हल्ल्यात शुभम जखमी झाला. त्यामुळे त्याला काही सुचेनासे झाले. त्याचवेळी पृथ्वी कुमावत, जय मोरे व इतरांनी हातातील स्टंपने शुभमवर हल्ला करुन त्याला आणखी जखमी केले. शुभम आणि  त्याचे चुलत काका आनंद अगोणे या दोघा जखमींना वाचवण्यासाठी रोहीत सरसावला.

दोघांचा बचाव करण्यासाठी रोहीत पुढे आल्याचे बघून वसंत बच्छाव याने त्याच्या छातीवर चॉपरने वार केला. अशा प्रकारे रोहीत हा देखील जखमी झाला. हा जीवघेणा हल्ला होत असल्याचे बघून शुभमसोबत असलेले काही मित्रांनी घटनास्थळावरुन आपला जीव वाचवण्यासाठी पलायन केले. झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात शुभम रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडून असतांना देखील सौरभ कोळी व काहीजण त्याला स्टंपसह बॅटने मारहाण करतच होते. या घटनेची चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला माहिती समजली. माहिती मिळताच चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधिक्षक तथा  डीवायएसपी अभयसिंह देशमुख, पोलिस निरीक्षक संदीप पाटील आदी अधिका-यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव  घेतली. पोलिस पथक घटनास्थळी आले  असता त्यांना तेथील हल्ल्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. जखमी शुभम जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता तरी देखील सौरभ कोळी व त्याचे साथीदार त्याला क्रिकेटच्या स्टंप व बॅटने मारहाण करतच होते. पोलिस आल्याचे समजल्यानंतर मारेकरी तेथून पळून जावू लागले. मात्र सौरभ कोळी, वसंत बच्छाव, चित्रा उर्फ जयश्री मोरे हे तिघे पोलिसांच्या तावडीत सापडले. या तिघांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत जखमी शुभमला होणारी मारहाण थांबवली.

जखमींना तातडीने नजीकच्या देवरे हॉस्पीटलमधे वैद्यकीय उपचारार्थ दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी शुभम यास मयत घोषित केले. बचावलेले जखमी आनंद अगोणे व रोहीत बोराडे यांच्यावर देवरे हॉस्पीटलमधे पुढील उपचार सुरु करण्यात आले. जखमी आनंद शिवाजी अगोणे याने देवरे हॉस्पीटलमधे उपचरादरम्यान पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार शुभमच्या हत्येप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

सौरभ अण्णा कोळी, अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी, सिद्धांत अण्णा कोळी, वसंत राजु बच्छाव, जय कैलास मोरे, पृथ्वी कुमावत, चित्रा उर्फ जयश्री कैलास मोरे व इतर  नावे माहिती नसलेले तिन ते चार  हल्लेखोर अशा  सर्वांविरुद्ध हा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होण्यापुर्वी घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या सौरभ कोळी, वसंत बच्छाव आणि चित्रा उर्फ जयश्री मोरे अशा तिघांना अटक करण्यात आली.  तपासा दरम्यान अजून तिघा संशयीत आरोपींची नावे निष्पन्न झाली. विष्णू कोळी, अमोल कोळी आणि राहुल कोळी अशी त्या तिघांची नावे आहेत. या तिघांपैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विष्णू कोळी यास जामनेर येथून ताब्यात घेत अटक केली. इतर  फरार संशयीत आरोपींचा शोध सुरु आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले व त्यांचे सहकारी पो.कॉ. प्रकाश पाटील, पोलिस नाईक तुकाराम चव्हाण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here