अण्णा हजारे! महाराष्ट्रातील एक वजनदार नाव. माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हणून त्यांची याबाबतची कामगिरी उज्ज्वल आहे. सर्वसामान्य जनतेवर उपकारच म्हणा ना. उपकार म्हणणे कुणाच्या पचनी पडत नसेल तर जनहितकारक माना हवं तर. अण्णा हजारे यांचे आजवरचे सक्रिय कार्य जनतेसमोर आहे. श्रीमान किसन बाबुराव हजारे (कि.बा.) तथा अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात हाती घेतलेले कार्य, राबवलेले उपक्रम, माहिती अधिकार कायदा यातून प्रशासनासह बदमाशी करणा-यांची अनेकांची अडचण झाली. इतकी की काही मंत्रीही धास्तावले.
अण्णांच्या उपोषण आंदोलनाचा धसका घेतलेले अनेक उच्चपदस्थ कासावीस झाले. इतके की अण्णा “वाकड्या तोंडाचा गांधी” अशीही नवी उपाधी त्यांना बहाल झाली. तसे तर महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्ता असतांना चालवलेला सत्य, अहिंसा, अस्तेय सत्याग्रह उपोषण या प्रयोगाचा ब्रिटिशांनाही दणका बसला होताच? आता त्याचीच पुढची आवृत्ती म्हणून अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन. हा उपक्रम जोशात शिखरावर असताना तेव्हाही अण्णा हजारे म्हणजे एनओसी सर्टिफिकेट देणारे टोलनाके आहे काय? अशीही टिका झाली होतीच.
सकाळचा तांबडा भडक सुर्योदय नजरेने बघू शकता? काही वेळेस पृथ्वीवर येऊन पोहचणारी रवी किरणे चमकतात. मध्यान्न क्षणी सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची हिंमत होत नाही. सायंकाळी उन्हाचा ताप दाह कमी होतो. तसे अण्णा हजारे यांच्या कार्याची आता संध्याबेला आहे. भ्रष्टाचाराचे रान माजवणारे,चौखूर उधळणा-यांना अंकुश लावण्याचे कार्य थांबल्यागत झाले आहे. अण्णा हजारेंवर स्तुतीसुमने वहावी हा आजचा विषय नाही. अण्णा हजारे यांच्या जोरदार आंदोलनाच्या काळात कुणी एका कथित उद्योगपतीने एक कोटी रुपयांची देणगी देऊ केली. ती अण्णांनी नाकारली. कुणी त्यांना “पंतप्रधान व्हा” असाही सल्ला देऊन पहिला.
अशाप्रकारची भलामण करत अण्णा हजारे यांचा सत्कार करण्याची संधी साधणारे संधीसाधू कमी नाहीत. हजार कोटींवर भ्रष्टाचार केल्याबद्दल जनता ज्यांना ओळखते, अशी काही मंडळीही त्यांना येऊन भेटली. अण्णांसमवेत छायाचित्र काढून पावन झाली असे समाधान घेऊन आम्ही भ्रष्टाचारी नाही बर का? असा जनसामान्यात संदेश पोहचवण्यात यशस्वी झाली. (असे त्यांना वाटत असल्यास खुशाल वाटू द्या. ये पब्लिक है सब जानती है.) अण्णांचे कार्य शिथिल झाले. त्यांनी सर्व जिल्ह्यातल्या समित्या बरखास्त केल्यावर देखील राळेगणसिद्धीतील काही महाभागांनी अण्णांची पुण्याई पळवून नेत हायजॅक करत समांतर दुकानदारी सुरु केली आहे. हे करणारे अण्णांच्या चळवळीतीलच लोक आहेत असे म्हणतात.
काही राळेगणसिद्धीत यादवबाबा मंदिर परिसरात बसून राज्याचा कारभार करत. अण्णांचे कार्यकर्ते म्हणून जिल्हा – जिल्ह्यात काम करणा-यांपैकी काही खंडणी उकळतांना पकडले गेले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. “अण्णा हजारे यांच्यासोबत फोटो काढून सोशल मिडीयासह वृत्तपत्रातून छापून आणा” अशा प्रकारचा गोरखधंदा काही वर्षापासून सुरु आहे. आजही तोच खेळ सुरु आहे. याबाबत सिने अभिनेता नाना पाटेकर यांनीही अण्णा हजारेना स्पष्ट कल्पना दिली होती. नाना पाटेकर म्हणाले होते की अण्णा, महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातील भ्रष्टाचारी, खंडणीखोर, खंडणीखोरीत पकडले गेलेले लोक तुमच्यासोबत फोटोसेशन करतात आणि गावाकडे जाऊन त्यांची तसली दुकानदारी चालवतात. तेव्हा हे सगळे सत्कार करणारे सभ्य समजू नका. अण्णांनी ते ऐकले. ते पुढे म्हणाले की कोण सदाचारी, कोण भ्रष्टाचारी हे कोणाच्या कपाळावर लिहीलेले नसते. ते मला कसे कळणार? जनतेनेच ते ओळखावे. देखावा आणि सोंगाला फसू नये.