जळगाव : वाळू चोरीस अटकाव करण्याकामी गेलेल्या महसुल अधिका-यांवर प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या हल्लेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. विशाल ऊर्फ विक्की नामदेव सपकाळे (रा. शंकरराव नगर, डीएनसी कॉलेज जवळ जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या हल्लाप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
पोलिसांना हवा असलेला विशाल सपकाळे हा पाचोरा परिसरात फिरत असल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ. विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ. जितेंद्र राजाराम पाटील, पोहेकॉ. नितीन प्रकाश बाविस्कर, पोहेकॉ राजेश बाबाराव मेंढे आदींनी त्याला पाचोरा बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. पुढील तपासकामी त्याला नशिराबाद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.








