जळगाव : चारचाकी वाहन चोरी करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांना पुढील तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. चंद्रकांत उर्फ गडया गोरख चौधरी (रा. अयोध्या नगर जळगाव) आणि विशाल लक्ष्मण माळी (रा. पारस मेडीकल अयोध्या नगर जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
एरंडोल पोलिस स्टेशनला ओमनी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. तपासादरम्यान चंद्रकांत उर्फ गडया व त्याचा साथीदार विशाल माळी हे दोघे संशयीत आरोपी अयोध्यानगर भागात रहात असून कालीपिली ओमनी चालवून आपला उदरनिर्वाह करत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला पुढील कारवाईच्या सुचना दिल्या. गुन्हे शोध पथकाने दोघांना त्याब्यात घेत त्यांची चौकशी केली. चौकशीअंती दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. दोघांना पुढील तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील स.पो.नि. अमोल मोरे यांच्यासह पो.उ.नि. गणेश वाघमारे, हे.कॉ. सुनिल दामोदरे, गोरख बागुल, रफिक शेख, महेश महाजन, संदिप सावळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, भगवान पाटील, राहुल बैसाणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी आदींनी या कारवाई व तपासकामी सहभाग घेतला.








