जळगाव : मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने धावत्या रेल्वेत, रेल्वे स्थानकावर आणि रेल्वे परिसरातील प्रवाशांकडील मोबाईल चोरणा-या पाच चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून प्रवाशांकडून चोरण्यात आलेले मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले आहेत. 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांना रेल्वे स्टेशन परिसरात एक संशयीत तरुण वावरतांना आढळून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सचखंड एक्सप्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरी केल्याचे कबुल केले. कृष्णा सावंत असे या चोरट्याचे नाव आहे. अन्य एका प्रवाशाने दिलेल्या माहितीच्या आधारे एका संशयीत चोरट्याला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. त्याने अमरावती एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून एका प्रवाशाचा मोबाईल चोरी केल्याचे कबुल केले. समीर पठाण असे या चोरट्याचे नाव आहे.
कुर्ला येथे एका संशयित चोरट्याचा पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले. रिझवान शेख असे नाव असलेल्या या चोरट्याने देखील एका प्रवाशाकडील मोबाईल चोरल्याची कबुली देत सुमारे 23 हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून दिला. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरुन दीपक वाघरी नावाच्या चोरट्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. कल्याण रेल्वे स्टेशनवरुन दशरथ ठाकूर नावाच्या चौरट्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 31 हजार 800 रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.