नाशिक (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): मंगळवार 20 फेब्रुवारीची सकाळ अंबड पोलिस स्टेशनच्या अधिकारी -कर्मचा-यांसह नाशिक पोलिस दलासाठी एक शोककळा पसरवणारी सकाळ ठरली. या दिवशी नेहमीप्रमाणे दुय्यम अधिकारी अशोक नजन हे नाशिक शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत येणा-या अंबड पोलिस स्टेशनमधे कर्तव्यावर हजर झाले. नेहमीप्रमाणे ते आपल्या कॅंबीनमधील खुर्चीवर येवून बसले. खुर्चीवर बसल्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या ताब्यातील सर्व्हिस रिव्हाल्वरने आपल्याच डोक्यात गोळी घालून स्वत:ची जीवनयात्रा संपवली. निरीक्षक नजन यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून थेट जीवनयात्राच संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापतरी एक गुढ म्हणावे लागेल. या प्रश्नाचे उत्तर भविष्यात यथावकाश पुढे येणारच आहे. यामागे एकतर व्यक्तीगत अथवा कार्यालयीन या दोघांपैकी एखादी सहज न सुटणारी समस्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या समस्येला वैतागून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे देखील बोलले जात आहे.
नवीन नाशिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको-अंबड परिसराची हद्द असलेल्या अंबड पोलिस स्टेशनला अशोक नजन कार्यरत होते. अंबड पोलिस स्टेशनला या दुर्दैवी घटनेच्या वेळी हजर असलेल्या कर्मचा-यांची हजेरी सुरु होती. ड्युटीवरील हजेरी मास्तर शरद झोले हे त्यांना बोलावण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले असता त्यांना निरीक्षक नजन रक्ताच्या थारोळ्यात खुर्चीवर एका बाजुला झुकलेल्या अवस्थेत दिसून आले.
हा प्रकार हजेरी मास्टरला दिसताच एकच हल्लकल्लोळ माजला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर आदींनी घटनास्थळी पोलिस स्टेशनला धाव घेत पुढील कारवाई व तपासाला सुरुवात केली.
गोळीबार झाला त्यावेळी पोलिस स्टेशनच्या पत्र्यावर झाडाची एखादी फांदी पडली असावी अथवा दगड पडला असावा असे समजून कुणी या फायरिंगच्या आवाजाकडे लक्ष दिले नाही. मात्र हजेरी मास्टरच्या येण्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी देखील पोलिस स्टेशनला येत पुढील तपासाची दिशा ठरवली. गोळी झाडून आत्महत्या करणारे अधिकारी नजन हे वैजापूर येथील मुळ रहिवासी होते. गेल्याच वर्षी जुलै महिन्यात त्यांची अंबड पोलिस स्टेशनला नियुक्ती झाली होती. पत्नी व मुलगा असा त्यांचा परिवार आहे.