जळगाव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे लोक त्यांना आलेल्या अनुभवानुसार म्हणतात. मात्र आता किमान एक वर्ष वाट पहा असे म्हणण्याची वेळ आली आहे. सरकारी कामासाठी नागरिकांचा कशा प्रकारे छळ होतो हे नुकत्याच एका घटनेतून दिसून आले आहे.
जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी अमळनेर प्रांत कार्यालय – जन माहिती अधिकारी यांच्या नावे गेल्या वर्षी 20 फेब्रुवारी 2023 रोजी माहिती अधिकारात एक अर्ज सादर केला होता. अमळनेर उप विभागीय महसुल अधिकारी सीमा अहिरे यांची वेतन श्रेणी 69000 रुपये असून त्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्र बसवण्यात आले असल्याची माहिती तब्बल एक वर्ष दोन दिवसांनी गुप्ता यांना नुकतीच मिळाली आहे. 22 फेब्रुवारी 2024 रोजी मिळालेल्या माहितीस आता 367 दिवस झाले आहेत.
सदर माहिती मिळाल्यानंतर दीपककुमार गुप्ता यांनी अमळनेर उप विभागाचे महसुल अधिकारी महावीर खेडकर यांच्याशी संपर्क साधत त्यांचे आभार व्यक्त केले आहे. माहिती अधिकारात वेळेवर माहिती न देण्यासाठी कसा छळ केला जातो त्याचे हे मुर्तीमंत, ताजे उदाहरण म्हणता येईल.