जळगाव : जिल्हा दूध संघात असलेली दुर्गंधी आणि पाहणी दरम्यान समोर आलेल्या विविध त्रुटी लक्षात घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाने जिल्हा दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय तुमचे औद्योगिक उपक्रम बंद का केले जाऊ नये याबाबतचा खुलासा देखील मागवण्यात आला आहे. दि. 27 फेब्रुवारी रोजी सर्व संबंधित कागदपत्रासह उपस्थित रहावे अन्यथा पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले जातील, असा इशारा देखील प्रदूषण मंडळाने दूध संघाला नोटीसच्या माध्यमातून दिला आहे. प्रदूषण विभागाचे प्रादेशिक अधिकारी एल.एस.भड यांनी ही नोटीस दूध संघाला बजावली आहे.
जिल्हा दूध संघ परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत तपासणी करण्याचे पत्र दिले होते. त्या पत्राचा आधार घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करणसिंग राजपूत तसेच मनपा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणी दरम्यान विविध त्रुटी जिल्हा दूध संघात आढळून आल्या. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हा दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्हा दूध संघातील समीकरण टाकीमध्ये गळती आढळून आली. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आढळून आला. याशिवाय याठिकाणी दुय्यम स्पष्टीकरण कार्यान्वित नव्हते. ईटीपी प्लानच्या आजू बाजूला घराची निकृष्ट व्यवस्था होती. परिसरात वृक्षारोपण सुधारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या सर्व बाबी लक्षात घेत तुमचे औद्योगिक उपक्रम बंद का करण्यात येवू नये?, तसेच वीज व पाणी खंडित करण्याचे निर्देश का देण्यात येवू नये? असा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दूध संघाला दिला आहे.