चाळीस हजाराच्या लाचेत अडकला सहायक फौजदार

धुळे : आझादनगर धुळे पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार आरिफअली सैय्यद यांना एसीबी पथकाने तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपयांची लाच  घेतांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी देखील एका घटनेत त्यांना 70 हजार रुपयांची लाच  घेतांना पकडण्यात आले  होते.

या घटनेतील तक्रारदाराच्या चुलतभावाचे 22 ऑगस्ट 2011 रोजी निधन झाले आहे. तक्रारदाराच्या मयत चुलत भावाने त्यांच्या हयातीत दोन कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली होती. त्यांच्या मृत्यूपश्चात विमा प्रतिनिधीने फसवणूक करुन विम्याची रक्कम वारसाच्या नावे जमा न करता दुस-या व्यक्तीच्या नावे खात्यावर जमा  केली होती. त्यामुळे हा फसवणूकीचा गुन्हा आझादनगर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला  होता. या फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार आरिफअली सैय्यद यांच्याकडे देण्यात आला  होता.

या गुन्हयातील परस्पर दुस-याच्या नावे जमा झालेली गोठविण्यात यावी आणि  वारसाच्या बॅंक खात्यात जमा  होण्यासाठी तक्रारदाराच्या बहिणीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्याकामी तपास अधिकारी सहायक फौजदार आरिफ अली  सैय्यद यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबी धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या पडताळणी दरम्यान सहायक फौजदार आरिफअली सैय्यद यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती चाळीस हजार रुपयांची मागणी केली. गिंदोडीया चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाच्या मागील बाजूस असलेल्या भाग्यश्री पान कॉर्नर समोर लाचेची रक्कम स्विकारतांना आरिफ अली  सैय्यद यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफडली सैय्यद हे सोनगीर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असतांना दि. 22 जुलै 2010 रोजी 70  हजार रुपये लाच रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी धुळे शहर  पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना सन 2013 मधे  पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सन 2019 मध्ये त्यांना दिलासा दिल्याने ते पोलीस खात्यात पुन्हा हजर झाले. त्यानंतर देखील त्यांची लाचेची लालसा सुटली नाही.  

लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच पपकातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी,  राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने कारवाई केली जाहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here