जळगाव : फैजपूर परिसरातील सट्टा, जुगार, दारु, गुटखा विक्री आणि वाहतुक अशा अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. उपोषणाबाबत त्यांनी सहायक पोलिस अधिक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांना निवेदन दिले आहे. 4 मार्च पासून ते कार्यकर्त्यांसोबत प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांनी शेख कुर्बान यांच्या निवेदनाची तातडीने दखल घेत त्यांना उपोषणाला बसण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. फैजपूर परिसरातील अवैध व्यावसायीकांविरुद्ध तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी शेख कुर्बान यांना म्हटले आहे. वरिष्ठांच्या कारवाईचा कल लक्षात घेत फैजपूर पोलिसांनी तातडीने परिसरातील सट्टा व्यावसायीकांना गोपनीय संदेश देत धंदे बंद करण्यास सांगितल्याचे समजते. स्वत: माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी फैजपूर शहरात पाहणी केली असता गुटखा विक्री व्यवसाय बंद असल्याचे दिसून आले आहे. मात्र सट्टा जुगार व्यावसायिकांना तूर्त व्यवसाय बंद करण्याचा संदेश गेला मात्र एकाही सट्टा जुगार पेढीवर रेड कारवाई झाली नसल्याची शेख कुर्बान यांची तक्रार आहे.
परिसरात कुठे कुठे सट्टा जुगार सुरु आहे याची आपण आम्हाला माहिती द्यावी असे आवाहन अन्नपुर्णा सिंह यांनी शेख कुर्बान यांना केले. मात्र हे काम आपले नसून पोलिसांचे आहे आणि पोलिसांना सर्व ठावठिकाणे माहिती असतात असे शेख कुर्बान यांनी अधिकारी सिंह यांना बोलतांना म्हटले. त्यावर पुढे बोलतांना अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांनी त्यांना उपोषणाची गरज नसून तातडीने सर्व अवैध व्यवसायांवर अंकुश बसणार असल्याचे सांगितले.
वास्तविक फैजपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ हे फैजपूरला आता जुने झाले आहेत. मात्र तरीदेखील आपण अजून नवीन असून आपल्याला काहीच माहिती नाही असे ते दर्शवत असल्याची ओरड आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी अन्नपुर्णा सिंह या नवीन असून देखील त्यांनी कारवाईची तयारी दाखवली आहे. सट्टा जुगार व्यावसायिकांना खब-यांममार्फत तूर्तास व्यवसाय बंद ठेवण्याचा संदेश दिला जात असल्याची शेख कुर्बान यांची तक्रार आहे.