जळगाव : जुन्या वादातून मेहरुण परिसरात राहणाऱ्या सोहम गोपाळ ठाकरे या तरुणावर गोळीबार करत पसार झालेल्या चौघा तरुणांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धुळे – देवपूर परिसरातून अटक केली आहे. दिक्षांत उर्फ दादू देवीदास सपकाळे याने सोहम ठाकरे यांच्यावर जुन्या वादातून गोळी झाडली होती. त्यानंतर आपल्या साथीदारांसह तो धुळे येथे त्याच्या आत्याच्या घरी गेला होता. पोलिसांनी त्याला त्याच्या साथीदारांसह 2 मार्च रोजी अटक केली आहे.
सोहम ठाकरे व दिक्षांत उर्फ दादू सपकाळे या दोघांमध्ये वाद झाले होते. 1 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोहम हा त्याचे मित्र भैय्या राजपूत, ऋषिकेश वंजारी, सनी सोनवणे यांच्यासोबत श्रीराम कन्या शाळेजवळ उभा होता. त्यावेळी दोन दुचाकीवर चौघे त्याठिकाणी आले. मी सांगतो तसे तू ऐकले नाही तर तुझा मुडदा पाहतो, असे म्हणत गोपाळने त्याच्या कंबरेला खोचलेली पिस्तूल दिक्षांत यांच्या हातात दिली. दिक्षांत याने सोहमवर गोळीबार करत त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेप्रकरणी चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हल्लेखोर संशयित दिक्षांत सपकाळे हा साथीदारांसह धुळे येथील देवपूर परिसरात त्याच्या आत्याकडे आला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. बबन आव्हाड यांना समजली. त्या माहीतीच्या आधारे पोउनि दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेका किरण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, छगन तायडे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे यांचे पथक धुळ्याच्या दिशेने रवाना झाले. पथकाने सकाळी सहा वाजेपर्यंत धुळ्यात शोध मोहीम पुर्ण करत दिक्षांतसह चौघांना अटक केली. गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित दीक्षांत याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी व इतर आठ गंभीर तर गोपाल चौधरी याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहेत. दोघे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.