जळगाव : एमआयडीसी परिसरातील स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज लिमीटेड या कंपनीतील कामगाराने दहा किलो वेस्टेज तांब्याची चोरी केली होती. या चोरीतील तांब्याच्या तुकड्यापैकी त्याच्याकडे दोन किलो तांब्याचे तुकडे सापडले होते. या घटनेप्रकरणी कंपनी व्यवस्थापक चंदन सुधाकर चौधरी यांनी चोरटा सुरेश ओंकार वाघ याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सुरेश वाघ याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. चोरीचे तांब्याचे तुकडे त्याने सोनुसिंग रमेश राठोड यास विक्रीसाठी दिल्याचे देखील कबुल केले. त्यामुळे सोनुसिंग राठोड याला देखील अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे 7 किलो वजनाचे तांब्याचे तुकडे हस्तगत करण्यात आले आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. वसीम देशमुख यांच्या आदेशाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सुधीर साळवे, सचिन पाटील, राहुल रगडे, साईनाथ मुंढे, नितीन ठाकुर, ललीत नारखेडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.