जळगाव : भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीत फायटर कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा खेळणा-या अकरा जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्व अकरा जणांना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 लाख 86 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील कु-हा या गावी एका शेताच्या बाजुला काही लोक कोंबड्यांची झुंज लावून त्यावर सट्टा खेळत असल्याची गोपनीय माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना समजली. त्या माहितीची खात्री करण्यासाठी हे.कॉ. सुरज पाटील यांना रवाना करण्यात आले. त्याठिकाणी कोंबड्यांची झुंज लावून सट्टा खेळला जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळल्यानंतर पो.नि. बबन जगताप, स.पो.नि. पाटील आणि सर्व सहका-यांच्या मदतीने घटनास्थळी जावून कारवाई करण्यात आली.
शेख सईद शेख सादीक, शेख जावेद शेख हाफीज, आशिष राजेश सोनी, नेलसन लेनीन पेट्रो, शेख आरीफ शेख युसुफ, मोसीन शेख युसुफ, शेख सलमान शेख सलीम, रशीद सैय्यद निसार, शेख शेहबाज शेख अकबर, अर्जुन बादल गरड, शेख इमाम शेख याकुब व इतर पाच ते सहा अनोळखी इसमांविरोधात भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकरा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
दोन हजार रुपये किमतीचे फायटर कोंबडे, 3600 रुपये रोख, 6 हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल व 5 लाख 75 हजार रुपये किमतीच्या चौदा मोटार सायकली असा एकुण 5 लाख 86 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल अटकेतील अकरा जाणांकडून जप्त करण्यात आला. भुसावळ उप विभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या पथकातील हे.कॉ. सुरज पाटील, संकेत झांबरे यांच्यासह भुसावळ तालुका पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक बबन जगताप, सपोनि विशाल पाटील, सफौ विठ्ठल फुसे, पोहेकॉ. युनुस शेख, पोहेकॉ. संजय तायडे, पोहेकॉ. प्रेमचंद सपकाळे, पोहेकॉ. संजय भोई, पोना जितेंद्र सांळुखे, पोकॉ. विशाल विचवे, पोकॉ. जगदिश भोई आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.