जळगांव ०९ मार्च २४ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या ३४ व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात ४१६ रक्त बॉटल चे संकलन झाले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, सिव्हिल हॉस्पीटल जळगाव या संस्थांनी रक्त संकलन केले.
स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिंना अभिवादन व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प घेतला आहे. कंपनीतील सहकाऱ्यांनी रक्तदान करून गरजूंची रक्ताची गरज भागवून सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल उचलले आहे. दिवसभर असलेल्या रक्तदान शिबिरात जैन प्लास्टिक पार्क येथे २०५, जैन फूडपार्क येथे १५२, अल्वर ०३, बडोदा १९, चित्तूर १६, हैद्राबाद ११ आणि उदमलपेठ १० असे रक्त बॉटल चे संकलन झाले.
मानवी रक्त हे गरजवंत व्यक्तीच्या जीवन-मरणाशी निगडित असते. आपल्या रक्ताच्या एका थेंबामुळे जर कुणाचाही जीव वाचण्यास मदत होत असेल, तर आपला जन्मही कृतार्थ होत असतो. आपल्या कंपनीने सुरु केलेल्या रक्तदानाच्या मोहिमेमुळे सामाजिक कार्यात हातभार तर लागतोच, तसेच आपण दरवर्षी केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचले असतील ही सुखद अनुभूती व समाजाचे ऋण फेडण्यास हातभार लागल्याची भावनाही रक्तदात्याच्या मनात नेहमी राहत असते अशी भावना कंपनीच्या सहकाऱ्याची आहे
जैन प्लास्टिक पार्क डेमो हॉल येथे सकाळी ८ वाजता औपचारिक आगळे वेगळे उद्घाटन झाले. कालच जागतिक महिला दिवस साजरा झाला त्या निमित्ताने महिला सहकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रक्तदान झाल्यावर महिला सहकाऱ्यांकडे रक्तदान प्रमाणपत्र सुपूर्त केले गेले. जैन फूडपार्क येथे डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. जैन प्लास्टिकपार्क, टाकरखेडा टिश्युकल्चर पार्क आणि जैन फूडमॉल येथील सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जैन फूडपार्क येथे जैन फूड पार्क, जैन अॅग्रीपार्क, जैन एनर्जीपार्क आणि जैन डिव्हाईन पार्क येथील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.