जळगाव : फैजपूर पोलिस उप विभागीय अधिकारी तथा सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या खासगी वाहनाला वाळू वाहून नेणा-या डंपर चालकाने धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी डंपरचालक, क्लिनर आणी डंपर मालक अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालकास अटक करण्यात आली असून क्लिनर फरार झाला आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे.
मयूर सुरेश कोळी (रा. डांभुर्णी, ता. यावल), असे अटक करण्यात आलेल्या डंपर चालकाचे नाव आहे. यावल रोडवर अवैध वाळू वाहतुक सर्रासपणे सुरु असल्याची माहिती पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग पाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे अन्नपुर्णा सिंह यांनी आपल्या सहका-यांसह खासगी वाहनाने यावल रस्त्यावर जावून संशयीत भरधाव वेगातील डंपरला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र डंपर चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर थांबवले नाही अथवा वेग देखील कमी केला नाही. त्यामुळे सिंह यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने डंपरचा पाठलाग करुन त्याला ओव्हरटेक केले. मात्र डंपर चालकाने पुढे धावणा-या वाहनाला धडक देत वाहनासह पलायन केले.
नंतर पोलिसांनी डंपर चालक मयुर कोळी याला ताब्यात घेत कारवाई सुरु केली. दरम्यान डंपरवरील क्लिनर पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेप्रकरणी डंपर चालक, मालक आणी क्लिनर या तिघांविरुद्ध फैजपुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नव्याने रुजू झालेल्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांनी फैजपूर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध कठोर पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. फैजपुर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध कायम तक्रारी आणि ओरड सुरु असते. काही दिवसांपुर्वी अधिकारी सिंह यांनी गुटखा विरोधी केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत उघडपणे अथवा लपूनछपून सुरु असलेले सट्ट्याचे अवैध धंदे देखील शिघ्रगतीने बंद करावेत तसेच त्यावर अंकुश लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.