क्लच वायरने बिबट्याचा गळा आवळणारे अटकेत

नाशिक : भोंदू बाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीसाठी सुपारी घेऊन बिबट्याची शिकार करणा-या शिका-यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली आहे. मोटार सायकलच्या क्लच वायरने गळा आवळून बिबट्याची शिकार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुख्य शिकारी – आरोपी नामदेव दामू पिंगळे याने त्याचा साथीदार सतोष जाखिरे याच्यामार्फत या शिकारीची ‘सुपारी’ दिली होती. संशयीत आरोपी नामदेव पिंगळे (रा. पिंपळगाव मोर), संतोष जाखिरे (रा. मोगरा), रवींद्र अघान (रा. खैरगाव), बहिरु ऊर्फ भाऊसाहेब बेंडकोळी (रा. वाघ्याची वाडी) आणि बाळू धोंडगे (रा. धोंडगेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.  

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी वनपरिक्षेत्र हद्दीत एका डोंगरावरील पाण्याच्या डोहाजवळ रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी वन्य पशू  पाणी पिण्यासाठी येत असतात. पाण्याच्या शोधात तहान भागवण्यासाठी आलेल्या बिबट्याची चकवा देत सापळा रचून या ठिकाणी क्लच वायरचा गळफास तयार करुन कृर हत्या करण्यात आली आहे. बिबट्याची कातडी सन्यासी दिलीप बाबा नावाच्या इसमाला विक्री करण्यापुर्वीच पोलिसांना हा डाव उधळण्यात यश आले असले तरी बिबट्याचा नाहक जीव गेला.   

संशयीत आरोपी संन्यासी दिलीप बाबा याला भोदूगिरीची दुकानदारी चालवण्यासाठी बसायला एक गादी तयार करायची होती. त्या गादीवर बिबट्याची कातडी लावायची होती. त्यासाठी या भोंदू बाबाने मुख्य शिकारी नामदेव दामू पिंगळे याला सुपारी दिली होती. नामदेव पिंगळे याने त्याचा साथीदार सतोष जाखिरे याच्या मार्फत हे काम  करण्याचे ठरवले. या शिकारीसाठी संशयीत आरोपी नामदेव पिंगळेसह एकुण पाच जण पुढे आले होते. बिबट्याची शिकार केल्यानंतर ती  निर्जन ठिकाणी वाळवण्यात आली. वाळवलेली कातडी भोंदूबाबाकडे विक्रीसाठी नेण्यापुर्वीच हा डाव उधळला. अटकेतील पाचही जणांना इगतपुरी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार भोंदू सन्यासी दिलीप बाबा याचा शोध  घेतला जात आहे.    

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या पथकातील सहका-यांनी 13 मार्चच्या पहाटे घोटी पोलिस स्टेशन हद्दीत पिंपळगाव मोर शिवारात सापळा लावण्यात आला. त्या सापळ्यात पाचही जण पोलिस पथकाच्या हाती आले. त्यांच्याकडून बिबट्याच्या कातडीसह कोयता जप्त करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा संदिप नागपुरे, चेतन संवस्तरकर, मेघराज जाधव, हेमंत गरूड, पोना विनोद टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांच्या पथकाने या कामगीरीत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here