रिक्षातील प्रवाशांचे पैसे हिसकावणारे दोघे अटकेत

On: March 15, 2024 10:42 AM

जळगाव : रिक्षातील प्रवाशांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावून घेणा-या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली रिक्षादेखील तपासकामी जप्त करण्यात आली आहे.  

औद्योगिक वसाहतीत काम करणारे निलेश शिलारे आणि शिवा शिलारे हे दोघे भाऊ 9 मार्चच्या मध्यरात्री आपल्या मुळ गावी जाण्यासाठी रेमंड चौकात रिक्षाची वाट बघत होते. त्यावेळी आलेल्या एका रिक्षात बसून दोघे रेल्वे स्टेशनला जाण्यास निघाले. रिक्षात रिक्षाचालकासोबत त्याचा साथीदार देखील बसलेला होता. रिक्षाचालकाने दोघा प्रवासी भावांना रेल्वे स्टेशनला न नेता खेडी पेट्रोल पंपाजवळ घेऊन गेले. याठिकाणी रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराने दोघा प्रवासी भावांना शिवीगाळ व दमदाटी करत  त्यांच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी निलेश शिलारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.   

तपासादरम्यान पो.नि. बबन आव्हाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे शोध घेत पोलिस पथकाने दोघांना क्रमाक्रमाने ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. चौकशीअंती दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. दोघांना अटक करण्यात आली. पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, पोउनि निलेश गोसावी, पोउनि दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment