जळगाव : बनावट पावती पुस्तकाच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या शासकीय रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करणाऱ्या ग्रामसेवकास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप चंद्रभान निकम (रा. जामनेर) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.
जळगाव पंचायत समितीत कार्यरत असलेले विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला संदीप निकम या ग्रामसेवकाविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल आहे. या फिर्यादीनुसार दिनांक 13 मार्च 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत संदीप निकम उमाळा ग्रामपंचायतमधे ग्रामसेवक पदावर कार्यरत असतांना त्याने घरपट्टी व पाणीपट्टीची बनावट पावती पुस्तके वापरली होती. या बनावट पावती पुस्तकांच्या माध्यमातून त्याने 5 लाख 58 हजार 506 इतक्या रकमेचा बँकेत शासकीय भरणा न करता स्वताच्या आर्थिक फायदयासाठी अपहार केला होता.
संदीप निकम याचे विरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनला देखील अपहाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून त्याचा ताबा एमआयडीसी पोलिसांनी घेतला आहे. 12 मार्च 2024 रोजी त्यास अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने 16 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक संजय पाटील व पो. शि नरेंद्र मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.